

पुणे, ता. १९ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेल्या भोजनगृहाच्या दरात प्रशासनाने वाढ केली आहे. सुधारित दर एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. प्रत्येक थाळीमागे १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीच्या निर्णयाविरोधात विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही दरवाढ तातडीने रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत अन्नधान्य, कडधान्ये, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, व्यावसायिक एलपीजी गॅस आणि कामगारांचे वेतन यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विद्यापीठ भोजनगृह चालकांकडून कोणतीही परवाना शुल्क, वीज किंवा पाणी शुल्क आकारत नाही. सद्यःस्थितीत वाढलेल्या महागाईमुळे जुन्या दरांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस आणि पोषक आहार देणे व्यवहार्य राहिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड न होता अन्नाचा उच्च दर्जा टिकून राहावा, या एकमेव उद्देशाने व्यवस्थापन परिषदेने किमान सुधारित भोजन दर निश्चित केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
सुधारित पत्रकानुसार, मर्यादित शाकाहारी थाळी मासिक सदस्यांसाठी ३८ रुपयांवरून ४८ रुपये, तर इतर ग्राहकांसाठी ४७ वरून ५७ रुपये केली आहे. दुसरीकडे, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक शोषण या मुद्द्यांवरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि इतर संघटनांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. दर वाढवूनही अन्नाच्या दर्जात सुधारणा होत नसल्याचा आरोप करत, प्रशासनाने अवैध पद्धतीने केलेली ही दरवाढ त्वरित मागे घेतली नाही, तर विद्यापीठ बंद पाडू, असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधी राहूल ससाणे यांनी दिला आहे.
‘‘भोजनगृह दरवाढ मान्य आहे, पण तिचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर नव्हे तर विद्यापीठाने उचलावा. विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाच्या भोजनगृह व गुणवत्ता नियंत्रण समितीचे सदस्य आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अभिषेक शेलकर यांनी सांगितले.
..........
‘‘विद्यापीठातील भोजनगृहामधील जेवण हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक भाग आहे. मात्र, थाळीच्या दरवाढीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. विशेषत: ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही दरवाढ परवडणारी नाही.’’
- एक विद्यार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.