esakal | पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

pune university

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने घेतली जाणार आहे. 

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेचा मार्ग सुकर; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी सुरक्षा, क्षमता आणि प्रति विद्यार्थ्यांसाठी येणारा खर्च लक्षात घेऊन खासगी कंपनीची निविदा विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या (पर्चेस कमिटी) बैठकीत मंजूर करण्यात आली. पुढील एक ते दोन दिवसात कंपनीला वर्कऑर्डर मिळणार असल्याने परीक्षेचा मार्ग सुकर झाला आहे. यासाठी कंपनीला प्रति प्रश्‍नपत्रिका 15 रुपयांचा दर निश्‍चित केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने घेतली जाणार आहे. "एमसीक्‍यू' परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने निविदा काढण्यात आली होती, त्यामध्ये चार कंपन्यांनी सहभाग घेतला. निविदा मंजूर करण्यासाठी मंगळवारी बराच वेळ बैठक झाली. मात्र, आखणी काही मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्यासाठी आज (गुरुवारी) दुपारी पुन्हा पर्चेस कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये निविदा मंजूर करण्यात आली. या बैठकीत कागदपत्रांची छाननी, परीक्षा घेण्याची क्षमता, प्रती प्रश्‍नपत्रीकेचा दर यावर चर्चा करण्यात आली, त्यानंतर हरियानातील एका कंपनीला अंतिम वर्षाच्या परीक्षेचे काम देण्याचे निश्‍चित झाले. प्रती पेपर 15 रुपये इतका दर निश्‍चित करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठास सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

"परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निश्‍चित करण्यात आली आहे. प्रती पेपरसाठी पंधरा रुपये दर निश्‍चित केला आहे. कामाची ऑर्डर एक दोन दिवसात मिळेल. एजन्सीने परीक्षा घेतल्यानंतर सर्व डेटा विद्यापीठाला द्यावा लागेल. 24 तास हेल्पलाइन सुरू करावी, मोबाईलवर सहजपणे परीक्षा घेता येईल अशा सुविधा त्या मध्ये असाव्यात अशा सूचना केल्या आहेत.''
- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

कुलगुरूंनी घेतला परीक्षेचा आढावा
अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पाडण्याचे आव्हान विद्यापीठावर आहे. त्यापार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करकळमकर यांनी परीक्षा विभागाला भेट दिली. प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी तयारीची माहिती कुलगुरूंना दिली.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वेळापत्रक जाहीर करण्यास गती
विद्यापीठ 12 ऑक्‍टोबर पासून परीक्षा घेण्यास सुरवात करणार आहे. बहुतांशी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक यापूर्वीच तयार झाले आहे, सर्व तयारी होणे आवश्‍यक होते. मात्र आता एजन्सी ठरल्याने परीक्षा विभागाने वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात केली आहे. विद्यापीठातील आंदोलनामुळे एक ते दोन दिवसात टप्प्याने सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर होईल.