अरे बापरे! भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

गंजलेले कपाट, तुटलेल्या खुर्च्या, नादुरुस्त संगणक, खराब झालेले फर्निचर अशा वस्तूंच्या लिलावातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सव्वाकोटी रुपयांची कमाई झाली आहे. 

पुणे - गंजलेले कपाट, तुटलेल्या खुर्च्या, नादुरुस्त संगणक, खराब झालेले फर्निचर अशा वस्तूंच्या लिलावातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सव्वाकोटी रुपयांची कमाई झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

होस्टेल, प्रशासकीय इमारत, शैक्षणिक विभागांना खराब झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे अवघड जात होते. त्यामुळे या वस्तू संबंधित विभागाच्या एखाद्या खोलीत, जिन्याच्या खाली किंवा परिसरात टाकून दिल्या जात होत्या होत्या. त्यातून अस्वच्छता झालीच; पण डेंगी, मलेरियासारख्या रोगांनाही निमंत्रण मिळत होते. त्यामुळे हे सर्व भंगार एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विविध विभागांमधून फर्निचर, इलेक्‍ट्रिक वस्तू, ई वेस्ट, प्लॅस्टिकच्या तुटलेल्या खुर्च्या, लोखंडी कपाट अशा अनेक वस्तू जमा झाल्या. त्याचा योग्य भाव मिळण्यासाठी विद्यापीठाने तीन टप्प्यांत लिलाव केला. त्यातून सव्वाकोटी रुपये विद्यापीठाला मिळाले. 

विद्यापीठातील विभाग आणि परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. यासाठी प्रशासकीय किचकट प्रक्रियेला बाजूला करून भंगार वस्तू बाजूला काढून लॉकडाउनच्या काळात लिलाव केला. त्यातून मिळालेले पैसे इतर चांगल्या कामांमध्ये वापरता येतील.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

किचकट प्रक्रियेमुळे खराब झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो; पण विद्यापीठ प्रशासनाने इस्टेट विभागाला सांगून, स्वतःहून हे भंगार बाजूला काढल्याने आमचा विभाग स्वच्छ झाला आहे.
- विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

‘मापात पाप’ करणाऱ्यांना समज  
विद्यापीठात इलेक्‍ट्रिक वजन काटा आहे; पण तो खराब झाल्याचे सांगून त्याचा वापर बंद करण्यात आला होता.  त्याऐवजी साधा वजन काटा वापरून वस्तूंचे वजन कमी नोंदवले जात होते. त्याचा फटका विद्यापीठाला बसून कमी पैसे मिळत होते. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘मापात पाप’ करणाऱ्यांना समज देत योग्य पद्धतीने वजन करून घेतले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University made huge amount of money from scrap metal