Pune University: नव्या शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठात स्वतंत्र कक्ष होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SPPU Pune University

Pune University: नव्या शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठात स्वतंत्र कक्ष होणार!

पुणे : 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' ची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ' स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन होणार अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी आज विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीदरम्यान केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. या बैठकीला प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे सदस्य, शैक्षणिक विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: Grampanchayat Result: राज्यातील 1079 गावांचा 'कारभारी' आज ठरणार

डॉ.कारभारी काळे म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी शैक्षणिक धोरणाबाबत वेळोवेळी अधिसूचना तसेच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र संचालकांची नेमणूकही करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याच्या दृष्टीने 'टास्क फोर्स' स्थापन करण्यात येणार आहे. या टास्क फोर्स च्या मार्गदर्शक सूचनेनुसार कक्षाचे कामकाज चालणार आहे.

आजच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बहुपर्यायी प्रवेश, बहुपर्यायी निर्गमन, पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धती, स्वयम व मुक्स, मुक्त व दूरशिक्षण, आंतरविद्याशाखीय अभ्यास व अभियांत्रिकी विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, भारतीय भाषांमध्ये अभ्यासक्रम सुरू करणेबाबत, भारतीय ज्ञान व्यवस्था, द्वीलक्षी व एकत्रित पदवी अभ्यासक्रम, प्रोफेसर इन प्रॅक्टिस, संशोधन विकास कक्ष, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश आदी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली असल्याचेही डॉ.काळे यांनी सांगितले.

हेही वाचा: Bhima Koregaon: एल्गार परिषदेच्या ज्योती जगतापांचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करत असताना ज्या महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे अशा महत्वाच्या विषयांबाबत या बैठकीत चार तदर्थ मंडळ स्थापन करण्याबाबतही आज निर्णय झाला. यामध्ये भारतीय ज्ञान व्यवस्था (इंडियन नॉलेज सिस्टीम) , समुदाय सहभाग (कम्युनिटी एंगेजमेंट), वैश्विक मानवी मूल्ये, भाषांतर अभ्यास आदी विषयांवर तदर्थ अभ्यास मंडळांची स्थापना करण्यात आली असल्याचे डॉ.काळे यांनी यावेळी सांगितले.