संरचना आराखड्याला तीन महिने?

संरचना आराखड्याला तीन महिने?
Published on: 

पुणे, ता. १८ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) स्ट्रक्चर प्लॅन (संरचना आराखडा) तयार करण्यास राज्य सरकारने दिलेली सहा महिन्यांची मुदत संपुष्टात आली आहे. या मुदतीत आराखडा तयार न झाल्याने ‘पीएमआरडीए’ने आणखी तीन महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली. मात्र अद्याप मान्यता मिळाली नाही.
पीएमआरडीए हद्दीतील गावांचा प्रारूप विकास आराखडा यापूर्वी तयार केला होता. मात्र त्यावरून न्यायालयीन वाद निर्माण झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रारूप आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्राधिकरणाने हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यापूर्वी संरचना आराखडा तयार करावा, असे आदेश फेब्रुवारीत प्राधिकरणाला दिले होते. त्यासाठी एमआरटीपी कायद्यातही सरकारने बदल केले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नगर विकास विभागाने प्राधिकरणाला संरचना आराखड्याचा इरादा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगररचना अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या सर्व प्रशासकीय पूर्ततेनंतर मे महिन्यात प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्राधिकरणाच्या हद्दीचा संरचना आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर केला. तसेच प्राधिकरणाच्या हद्दीचा नकाशाही प्रसिद्ध केला. त्यानंतर संरचना आराखड्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू होते. परंतु, हा आराखडा तयार करणे प्राधिकरणाला शक्य झाले नाही. ही मुदत गेल्या महिन्यातच संपुष्टात आली. त्यामुळे हा आराखडा तयार करण्यास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव प्राधिकरणाने सरकारकडे पाठविला आहे. मात्र त्यास मान्यता मिळाली नसल्याचे प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

काय आहे उद्देश?
१) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या भागातील वाहतुकीची कोंडी फोडणे
२) ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करणे
३) प्राधिकरणाच्या संरचना आराखड्यात पहिल्या टप्प्यात रस्त्यांचे जाळे आखणे
४) ‘पीएमआरडीए’ हद्दीत किमान १८ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित करणे
५) घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, टाऊन हॉल अशा मूलभूत पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करणे
६) संरचना आराखड्यानंतर विकास आराखडा (डीपी) करण्याचे काम प्राधिकरण हाती घेणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.