विजयस्तंभ अभिवादनासाठी निर्धास्तपणे या...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने समन्वय ठेवत चांगली पूर्वतयारी केली आहे. जातीय तणाव निर्माण करणाऱ्या, दंगलीतील आरोपी आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना सुविधा देण्यासोबतच सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

- विश्‍वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक 

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी 1 जानेवारी रोजी सुमारे दहा लाख नागरिक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सुविधा पुरविण्यासह अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. येथील वातावरण सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण असून, मनात किंतु न बाळगता अभिवादनासाठी निर्धास्तपणे या, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी केले. 

विजयस्तंभ अभिवादनाच्या दिवशी कोणत्याही सभांना बंदी नाही. मात्र, त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. आतापर्यंत रिपब्लिकन पक्षासह पाच संघटनांना परवानगी देण्यात आली आहे. विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेशासाठी आणि परत जाण्यासाठी दोन वेगवेगळी ठिकाणे असतील. भडकाऊ भाषणे आणि जातीय विद्वेष पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. हा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी 1211 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

एखादी अनुचित घटना घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे, असे या वेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होत्या. 

कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात... 

- गतवर्षी दंगलीत असणाऱ्या 64 जणांना प्रवेशबंदी 
- सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 45 जणांवर कारवाई 
- एक जानेवारी रोजी अंशतः वीज बंद, इंटरनेटही बंद राहणार 
- नागरिकांच्या मदतीसाठी - "आय हेल्प यू' कक्ष आणि पोलिस मदत केंद्रे 

वाहतुकीत बदल 

- 31 डिसेंबरच्या रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत काही ठिकाणी वाहतूक वळविणार 
- नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळविण्यात येतील. 

- नगरकडून हडपसर आणि पुण्याकडे येणारी वाहने शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, न्हावरा, केडगाव चौफुला आणि सोलापूर हायवेमार्गे हडपसर पुण्याकडे वळविण्यात येतील. 
- पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने चाकणमार्गे किंवा खराडी बायपास येथून हडपसर, सोलापूर हायवेमार्गे केडगाव चौफुलामार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहेत. 

''कोरेगाव भीमासह आसपासच्या गावांमध्ये सामाजिक एकोप्याचे वातावरण आहे. गतवर्षीच्या दंगलीमुळे स्थानिक नागरिकांचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे. यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची प्रशासनाकडून आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत आहे''. 

-  नवल किशोर राम, जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Vijay Sthambh Come With Fearfree