

पुणे, ता. ७ ः जिल्हा परिषदेची राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी, आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आणि आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात चार ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यंदाच्या अभियानात जुन्नर तालुक्यातील काळवाडी ग्रामपंचायतीने पुणे विभागात तृतीय क्रमांक मिळविला, तर जिल्हास्तरावर पुरंदर तालुक्यातील गुरोळीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आंबेगाव तालुक्यातील रांजणी आणि निघोटवाडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. या चारही ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी ६० लाख रुपयांची पारितोषिके जाहीर झाली आहेत.
ग्रामविकास विभागाने या पुरस्कारांची घोषणा केली. २०२५-२६ या वर्षात राबविण्यात आलेल्या अभियानातील कामगिरीच्या आधारे ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावरील समित्यांनी विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यांकन केले. गुणांकनाच्या आधारे पुरस्कार निश्चित करण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत केली. ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सक्षम करणे, विकासकामांना चालना देणे आणि ग्रामविकासात लोकसहभाग वाढविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. विभागस्तरावरील पुरस्कारामध्ये काळवाडी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावून ६० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. जिल्हास्तरावर गुरोळी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवत ५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. रांजणी ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख, तर निघोटवाडीला तृतीय क्रमांकासाठी २० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
‘‘ग्रामविकासासाठी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी विभाग आणि जिल्हास्तरावर मिळविलेले यश इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी आहे.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
‘‘नियोजनबद्ध कामकाज, प्रशासकीय समन्वय आणि लोकसहभागाच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ही कामगिरी केली आहे. या पुरस्कारातून मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा उपयोग ग्रामविकासासाठी होईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.