

पुणे, ता. १८ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, प्रारूप मतदार यादीतील निश्चित झालेल्या मतदार संख्येनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ६२ लाख १० हजार ३७४ इतकी झाली आहे. तर यापूर्वी जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ होता. आता चिंचवडऐवजी भोसरी विधानसभा मतदारसंघ मोठा ठरला आहे. तर सर्वात लहान मतदारसंघाची जागा कसबाऐवजी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाने घेतली आहे.
मतदार पुनरीक्षण मोहिमेची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदारांपैकी ६२ लाख १० हजार ३७४ मतदारांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. तर २८ लाख ६९ हजार ७९५ मतदार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार असल्याचे दिसून आले. ही नावे २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. वगळलेल्या मतदारांनी कागदपत्रांचे पुरावे सादर केल्यानंतर त्यांचा समावेश अंतिम मतदार यादीत करण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून नवमतदारांची नोंदणी बंद आहे. ही नोंदणी आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे एकूण मतदारसंख्येत सुमारे दीड लाख मतदारांची भर पडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
मोहिमेपूर्वी जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून चिंचवडची ओळख होती. विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी या मतदारसंघात ६ लाख ८७ हजार ४४८ मतदार होते. मात्र, पुनरीक्षणानंतर हे स्थान भोसरी मतदारसंघाने मिळविले आहे. भोसरीमध्ये सर्वाधिक ४ लाख ६३ हजार १२९ अर्जांचे डिजिटायझेशन झाले आहे. चिंचवडमध्ये आता ४ लाख १७ हजार ३५१ मतदार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ ठरेल. त्यानंतर शिरूरमध्ये ३ लाख ७२ हजार ००७, भोरमध्ये ३ लाख ५९ हजार २८० आणि हडपसरमध्ये ३ लाख ५२ हजार ९२७ मतदार राहण्याचा अंदाज आहे.
शिवाजीनगर सर्वांत लहान मतदारसंघ
मोहिमेपूर्वी २ लाख ८४ हजार ६७२ मतदार असलेला कसबा पेठ हा जिल्ह्यातील सर्वांत लहान मतदारसंघ होता. आता त्याची जागा शिवाजीनगरने घेतली आहे. शिवाजीनगरमधील केवळ १ लाख ६२ हजार ६१८ अर्जांचे डिजिटायझेशन झाले आहे. कसबा पेठमध्ये १ लाख ९२ हजार ०८७ मतदार राहण्याचा अंदाज असल्याने, तो दुसऱ्या क्रमांकाचा लहान मतदारसंघ असेल. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये १ लाख ७९ हजार ३०६, पर्वतीमध्ये २ लाख १९ हजार २१४ आणि पिंपरीमध्ये २ लाख ३६ हजार १४८ मतदार असण्याची शक्यता आहे.
मतदारसंघ - मोहिमेपूर्वीची - संभाव्य
जुन्नर ३,२९,७५४ - २,८२,७७३
आंबेगाव ३,१७,९४७ - २,७६,४६५
खेड-आळंदी ३,७८,७१३ - ३,२२,६६०
शिरूर ४,८१,९९० - ३,७२,००७
दौंड ३,२३,०९९ - २,६९,११९
इंदापूर ३,४७,१४१ - २,९४,९२५
बारामती ३,८०,९२३ - ३,३६,०५७
पुरंदर ४,९७,७७० - ३,०९,४९५
भोर ४,५०,२०६ - ३,५९,२८०
मावळ ३,८२,७८८ - २,९०,७२३
चिंचवड ६,८७,४४८ - ४,१७,३५१
पिंपरी ४,०१,९७५ - २,३६,१४८
भोसरी ६,३५,११४ - ४,६३,१२९
वडगाव शेरी ५,१८,७५४ - ३,१४,६५२
शिवाजीनगर २,९२,८५१ - १,६२,६१८
कोथरूड ४,४८,०५५ - २,४०,७७६
खडकवासला ५,९७,११४ - ३,१८,६६२
पर्वती ३,७१,२३४ - २,१९,२१४
हडपसर ६,५१,४७३ - ३,५२,९२७
पुणे कॅन्टोन्मेंट ३,०१,१५२ - १,७९,३०६
कसबा पेठ २,८४,६७२ - १,९२,०८७
जिल्हा एकूण ९०,८०,१७३ - ६२,१०,३७४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.