पुणे : जलवाहिनीच्या कामासाठी जलसंपदाची एनओसीची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

पुणे शहरात महापालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यामध्ये सुमारे १७०० किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाणार आहे.

पुणे : जलवाहिनीच्या कामासाठी जलसंपदाची एनओसीची प्रतिक्षा

पुणे - महापालिकेला (Pune Municipal) समान पाणी पुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) अंतर्गत हडपसर माळवाडी परिसरात सहा पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. त्यांना जोडली जाणारी जलवाहिनी बेबी कॅनॉलच्या बाजूने टाकली जाणार आहे. पण गेल्या दोन वर्षापासून जलसंपदा (Water Resources) विभागाकडून हे काम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC Certificate) मिळत नसल्याने हे काम ठप्प झाले आहे. पर्यायाने या भागातील लाखो नागरिकांना पुरसे पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे.

शहरात महापालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यामध्ये सुमारे १७०० किलोमीटरची जलवाहिनी टाकली जाणार आहे. ३६ टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ६ टाक्या या हडपसर, माळवाडी, साडे सतरानळी या भागात बांधण्यात आल्या आहेत. या टाक्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे तीन किलोमीटरची जलवाहिनी बेबी कॅनॉलच्या बाजूने टाकली जाणार आहे. हे काम करण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. पण अद्यापही हे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. ही परवानगी मिळाल्यास एका ते दोन महिन्यात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करून या परिसरातील सुमारे चार लाख नागरिकांना पुरेसे पाणी देणे शक्य होणार आहे.

हडपसर परिसरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही यासाठी वारंवार नगरसेवक मुख्यसभेमध्ये आंदोलन करतात, प्रशासनावर टीका करतात. नुकतेच स्थायी समितीच्या बैठकीत या भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, त्यामुळे मिळकतकरातून पाणीपट्टी रद्द करावी असा प्रस्ताव देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला होता. एकीकडे महापालिकेत नगरसेवक आंदोलन करत असताना दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून एनओसी मिळत नसल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले असल्याचे समोर आले आहे.

हडपसर, साडेसतरानळी, माळवाडी भागातील पाणी पुरवठ्यासाठी ६ टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. या टाक्यांना जलवाहिनी जोडण्यासाठी बेबी कॅनलच्या बाजूने काम करायचे आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून एनओसी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे एका अधिकाऱ्याने सांगितले.