

पुणे, ता. १४ : बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्रासाठी जागेची कमतरता भासत असल्याने पीएमपी बस डेपोची मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. १४) स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बाणेर-बालेवाडी भागातील रहिवाशांची संख्या, बाजारपेठ विस्तारल्याने कचरा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोसायट्या, बाजारपेठेतून कचरा गोळा केल्यानंतर तो बालेवाडी येथील सेवा रस्त्याच्या लगत संकलित केला जातो. त्यानंतर हा वर्गीकरण केलेला कचरा विविध कचरा प्रकल्पांवर पाठवला जातो. सध्या कचरा संकलनासाठी उपलब्ध असलेली जागा कमी पडत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गालगत कचरा विखुरला जाऊन हा परिसर अस्वच्छता वाढत आहे, कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला बसून काम करावे लागत आहे. त्यामुळे कचरा संकलनासाठी कर्मचाऱ्यांना उघड्यावरच काम करावे लागत होते. त्यामुळे पीएमपीची जागा कचरा संकलनासाठी उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव नगरसेविका मयूरी कोकाटे यांनी मांडला होता. त्यास मंजुरी देण्यात आली.
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्यालगत साचलेला कचरा दिसत असल्याने महापालिकेच्या स्वच्छतेच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील पीएमपी बस डेपोतील सुमारे तीन हजार चौरस फूट जागा कचरा संकलन केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
त्वष्टा कासार समाज संस्थेला मदत
स्थायी समितीने कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्था वाचन मंदिराला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचन संस्कृतीला आणि सामाजिक उपक्रमांना बळ मिळावे, या उद्देशाने हे साहाय्य देण्यात आले. या वाचन मंदिरात वाचकांसाठी सुमारे ५० हजार पुस्तके नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.