

पुणे, ता. १८ : शहरालगत असलेल्या गावांअंकुलस मध्ये तसेच मोठ्या गावांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने घनकचरा प्रकल्पांचे संकुल (क्लस्टर) करण्याचे ठरवले आहे. यामाध्यमातून आजूबाजूच्या गावांमधील कचऱ्याचे संकलन करून प्रकल्पामध्ये त्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्पांची ठिकाणे निश्चित होणार असून, कचऱ्याची समस्या कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे.
घनकचरा प्रकल्पासह कचरा वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या ही खरेदी करण्याचे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केले आहे. गावांमधून जाणाऱ्या महामार्गांच्या बाजूला गावातील कचऱ्याचा खच पाहायला मिळतो. यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्याही जाणवतात. याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनिधींनीही विविध बैठकांमध्ये विषय मांडला आहे. मात्र, यामध्ये फारसा बदल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. मोठ्या बाजारांच्या गावांमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच डोकेदुखी ठरू लागली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना तुटपुंज्या ठरत असल्याने पावसाळ्यात न उचललेल्या कचऱ्यामुळे गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या सर्वांचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाकडून घनकचरा प्रकल्पाचे क्लस्टर निर्माण करण्याचे ठरवले आहे. यापैकी काही ठिकाणी खत निर्मितीचीही संकल्पना मांडण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींनी केले दुर्लक्ष...
वित्त आयोगाच्या बंधित निधीतून सांडपाणी आणि घनकचरा प्रकल्पासाठी गती देण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रकल्पासाठी निधी देण्याचेही शासनाने ठरवले होते. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले. परंतु, यामध्ये ग्रामपंचायतींची उदासीनता दिसून आली. काही मोजक्याच ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवले होते. आता प्रत्येक गावांमध्ये प्रकल्प करण्याऐवजी काही गावांचा मिळून एकत्रित प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले आहे.
वित्त आयोगातून निधीचे एकत्रीकरण...
जिल्हा परिषदेकडे प्रकल्प उभारण्यासाठी वित्त आयोगाचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा वित्त आयोगाचा निधी हा एकत्रित केला जाणार आहे. या निधीच्या एकत्रीकरणातून प्रकल्पाची उभारणी आणि घंटागाड्यांची खरेदी करण्याच्या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. त्यावर प्रकल्पामध्ये खतनिर्मिती आणि घंटागाड्या या इलेक्ट्रिक घेण्याचे निश्चित झाले.
ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या आहे. विशेषतः मोठ्या गावांमध्ये ही समस्या जाणवते. त्यासाठी घनकचरा प्रकल्पाचे संकुल करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी गावांची निवड करण्यात येणार आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.