
पुणे : पाणी प्रश्न तीव्र असताना पाषाण पम्पिंग स्टेशन येथे पाण्याच्या टाकीतून गळती
बालेवाडी: गेल्या अनेक महिन्यांपासून बाणेर बालेवाडी, पाषाण,सुतारवाडी महाळुंगे या भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक सोसायट्यांना टँकरचे पाणी पैसे मोजून घ्यावे लागत आहे. भर उन्हाळ्यात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत,याचे कारण म्हणजे या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाषाण येथील पंपिंग स्टेशनच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असून हे पाणी राम नदीमध्ये वाहत जाऊन पाण्याचा अपव्यय होत आहे.
बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी या भागासाठी चांदणी चौक येथून पाषाणच्या टाकीत पाणी आणले असून या ठिकाणाहून पुढे या भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या भागात पाणीटंचाईमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. सोसायटी मधून पाण्याचे टॅंकर मागण्याशिवाय पर्याय नाही. हा पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्यामुळे पंपिंग स्टेशन ला येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले तरी पाणी प्रश्न कायमच आहे.
त्यामुळे मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या पंपिंग स्टेशनची पाहणी केल्यानंतर या टाकीतून 24 तास मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गळती होत असल्याचे समोर आले. या टाकीत येणाऱ्या पाण्या पैकी सुमारे 30 ते 40 टक्के पाणी हे टाकीतून गळून जाऊन शेजारी वाहणाऱ्या रामनदीला जाऊन मिळत आहे. याबाबत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले, "गेल्या तीन महिन्यापासून या टाकीतून जवळपास 24 तास दररोज एक करोड लिटर पिण्याचे पाणी राम नदीला जाऊन मिळत आहे.यामुळे या भागात एक करोड लिटर पाणी पुरवठा कमी पडतो आहे. ही समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांना माहीत असूनही ती सोडविण्यात न आल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच बरोबर पुणे महापालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसून, जाणीवपूर्वक बाणेर बालेवाडी च्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार आपण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित दादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्याकडे करणार असून या सर्वांनी पाणी प्रश्न सोडविण्याकरिता लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याचेही सांगितले."
गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी अतिशय कमी दाबाने येते.तरी हा प्रश्न लवकर सोडवावा ही विनंती.
संगीता नखाते. बालेवाडी
पाषाणची ही टाकी खूप जुनी असल्यामुळे या ठिकाणी पाणी गळती होत आहे.यासाठी इथे वेळोवेळी उपाययोजनाही केल्या आहेत, पण टाकी जुनी असल्यामुळे पुन्हा पुन्हा दुरुस्ती करावी लागते.या टाकीच्या बाजूलाच नवीन टाकीचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.ही टाकी झाल्यानंतर जुन्या टाकीचा वापर बंद केला जाईल व हा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल.
प्रसन्नराघव जोशी.अधिक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे मनपा.
Web Title: Pune Water Tank Pashan Pumping Station Water Problem Acute
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..