'कोणी जमीन घेता का जमीन, चंद्रावरील जमीन'

moon-land2-(432x720).jpg
moon-land2-(432x720).jpg

पुणे : परिसर 'डि 5', प्लॉट नं डि 4548. जागेचे ठिकाण - ऍरीगो, सी/ऑफ ट्रॅंकीलीटी. हा पत्ता आहे, पुण्यातील राधिका दाते-वाईकर यांनी चंद्रावरील "प्लॉटींग'मधून खरेदी केलेल्या प्लॉटचा. कदाचित तुम्हाला खोटे वाटेल पण, संबंधीत जमीनीचे फोटो, खरेदीखत, जमीनीचे हक्क असे कायदेशीरदृष्ट्या सारेकाही दस्तऐवज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. 13 वर्षानंतर आता त्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे आता त्या "कोणी जमीन घेत का, जमीन. चंद्रावरील जमीन' असे म्हणत पैसे मिळण्याची वाट पाहत आहेत ! 

कोथरुड परिसरामध्ये "एलियन' आल्याची दखल दस्तुरखुतद्द पंतप्रधान कार्यालयाने घेऊन त्यादृष्टीने पुणे पोलिसांना तपास करायला लावला होता. "एलियन'नंतर आता चंद्रावरील प्लॉट खरेदी-विक्रीचे प्रकरण पुढे आले आहे. 2005 मध्ये लुनर फेडरेशनद्वारे स्वतःच्या व पत्नीच्या नावे चंद्रावर दोन एकर जमीन खरेदी करणाऱ्या पंजाबमधील एका नागरीकाची लोकप्रिय इंग्रजी वृत्तवाहिनीवर मुलाखत झाली होती. ती मुलाखत राधिका यांनी पाहीली. आई-वडीलांप्रमाणे आपणही एखादा जमीनीचा तुकडा, प्लॉट खरेदी करावा, अशी इच्छा शेतकरी कुटुंबातील राधिका यांच्या मनात निर्माण झाली. मात्र त्यांनी ही जमीन पुण्यात किंवा कोणत्याही गावात खरेदी केली नाही, तर थेट चंद्रवर पाडलेल्या "प्लॉटींग' मधून एक प्लॉट खरेदी केला. तोही प्लॉट साधा नव्हता, तर खास ट्रॅंकीलीटी (पाणी असलेली जमीन) असलेला मिळाला. त्यासाठी त्यांनी विद्यार्थीदशेपासून जमविलेल्या 50 हजार रुपये चंद्रावरील प्लॉटच्या गुंतवणूकीत गुंतविले. 

काही दिवसांनी राधिका यांना प्लॉट खरेदी केल्याची सर्व कागदपत्रे, खरेदीखत, जागेचे फोटो यांसारखी कायदेशीरदृष्ट्या महत्वाचे असणारे दस्तऐवजीही मिळाले. त्यामध्ये संबंधीत प्लॉटवर खणन करताना कोणत्याही प्रकारचे खनिज आढळल्यास त्याचेही हक्क राधिका यांच्याकडे देण्यात आल्याचे कागदत्र होते. एकदाचा प्लॉट खरेदी केल्यामुळे त्याही सुखावल्या. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी प्लॉटची नेमकी काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी संबंधीत कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणुक झाली आहे, हे कळल्यानंतर त्यांनी 2007 मध्ये कोथरुड पोलिस ठाणे गाठले होते. मात्र पोलिसही त्यावेळी काही करु शकले नाहीत. 

चंद्रावरील प्लॉटचे काय होईल?
राधिका यांचा मुलगा अकरावी विज्ञान शाखेत आहे. त्यास 12 वीसाठी जादा खर्च येईल, त्यामुळे पैशांची तजवीज आत्तापासूनच करण्यासाठी त्यांनी चंद्रावरील प्लॉटचे काही होईल काय ? यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. मात्र अद्याप त्यांना संबंधीत कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी "नासा'मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधला आहे. त्यांनी या प्रकरणामध्ये राधिका यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले आहे. 

सायबर पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा
इंटरनेट, सायबर क्राईम अशा संकल्पना जादा परिचित नसतानाच्या काळात राधिका यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे हे उदाहरण आहे. त्यावेळी पोलिसांनी दखल घेतली नाही, आता मात्र "सायबर पोलिस' अस्तित्वात असल्यामुळे राधिका यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने त्यांची धडपड सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com