Year Ender 2022 : पुण्यातल्या 12 महिन्यातल्या 22 घटना; ज्यांचा परिणाम राज्यावर झाला

Pune Year Ender 2022
Pune Year Ender 2022esakal

सरत्या वर्षाला निरोप देताना पुणेकरांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्यात ज्यामुळे पुण्याचं पर्यायाने राज्याचं समाजकारण राजकारण अर्थकारण बदलून गेलंच मात्र अनेकांना या घटनांपासून सुखद आणि दुःखद दोन्ही असे धक्के बसले आहेत... नेमक्या कुठल्या आहेत बारा महिन्यातील पुण्यातील त्या 22 घटना जाणून घेऊया.

'अनाथांची माय'ने पोरकं केलं

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे २०२२च्या पहिल्याच महिन्यात दुःखद निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मानवतेची केवळ भाषा न करता ती कृतीतून साकारणाऱ्या "माई" ला पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले होते.

पुणे पोलिसांनी अवळ्या अतिरेकी जुनेदच्या मुसक्या

महाराष्ट्र एटीएस तपास पथकाकडून राज्यात घातपात घडवण्याच्या उद्देशाने आलेल्या दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू असताना पुण्यातून एका अतिरेक्याला अटक करण्यात आली. दापोडी परिसरातून जुनेद मोहम्मद याला पुणे पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने जानेवारीत अटक केली

बजाज ग्रुपचा आधारस्तंभ हरपला

२०२२ च्या सुरुवातीलाच १२ फेब्रुवारी रोजी बजाज समुहाचे मानद चेअरमन राहुल बजाज यांचे निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. १९६५ मध्ये बजाज समूहाची स्थापना केली. तसेच त्यांच्याच कार्यकाळात बजाजने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा कंदील

पुणेकरांची स्वप्नपूर्ती असलेला ड्रीम प्रोजेक्ट "पुणे मेट्रोचे" उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्च महिन्यात करण्यात आले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिकीट काढून गरवारे स्टेशन ते आनंदनगर पर्यंतचा प्रवास केला होता. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 22 हजार पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला.

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये ऑगस्ट महिन्यात हल्ला झाला. कात्रज भागात आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परत जात होते. त्याचवेळी उदय सामंतांची गाडी तिथं पोहोचली आणि आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीची मागची काच फोडली.

पुण्यातील नवले पुल ठरला अपघाताचा हॉटस्पॉट

बंगळुरू-मुंबई बाह्य वळण महामार्गावरील असलेला नवले पुल यावर्षी अपघाताचा हॉटस्पॉट ठरला. 2014 ते 2022 दरम्यान या पुलावर आत्तापर्यंत 190 अपघात घडलेले असून त्यात 65 जणांचा मृत्यू झाला. खासदार, आमदार, स्थानिक नगरसेवक यांनी अनेक वेळा या पुलाची पाहणी केली मात्र वर्षाखेरेपर्यंत यावर कुठलाच तोडगा निघाला नाही आणि अपघाताची मालिका अजूनही सुरूच आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत हल्ला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या घटनेत सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा कोयता गँगची दहशत

पुण्यात गुन्हेगारीचा कळस पाहिला मिळाला. शहरातील अनेक उपनगरांमध्ये कोयता यांची दहशत पाहायला मिळाली. नागरिकांवर कोयताने हल्ला करणे, व्यवसायिकांना लुटणे या सारख्या प्रकाराने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले गेले. इतकच काय तर कोयता बँक चा मुद्दा हा राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात देखील मांडण्यात आला

इतिहासात प्रथमच पुरुषोत्तम करंडक कोणाकडे नाही

सप्टेंबर महिन्यात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकीका स्पर्धेतील विजेत्यांना आयोजक-परीक्षकांनी करंडकांपासूनच वंचित ठेवलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये यंदा एकही पात्र एकांकिका नसल्यानं करंडक कुठल्याही संघाला जाहीर झाला नाही. स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडलं.

...जेव्हा ४०० हून अधिकारी शोधत होते डुग्गूला

शहरातील उच्चभ्रु परिसरातून ११ जानेवारी रोजी डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकिसमोरून ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या चिमुकल्याचा शोध घेत होते. अन् अखेर तो सापडल्यानंतर सगळ्यांचा जीवात जीव आला

मर्सिडीज बेंझचे सीईओ वाहतूक कोंडीत अडकले अन् ...

पुण्यातील वाहतूककोंडीचा फटका हा जगातील आलीशान कार कंपनी असलेल्या मर्सिडीज बेंझच्या सीईओ मार्टिन श्वेंकयांना देखील बसला. वाहतूक कोंडीत त्यांनी आलीशान कार रस्त्यावरच सोडली आणि काही अंतर चालत प्रवास केला आणि त्यानंतर चक्क रिक्षात बसले. श्वेंक यांना आलेला अनुभव त्यांनी स्वतः इंस्टाग्रामवर शेयर केला होता.

गणपती विसर्जन मिरवणुकीने नोंदवला विक्रम

देशात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ३० तासांपेक्षा अधिक चालली. कोविडच्या दोन वर्षानंतर पुणेकरांनी बाप्पाला वाजत गाजत निरोप देताना विसर्जन मिरवणुकीचा रेकॉर्ड मोडला. गणपतींच्या रथासमोर असलेली ढोल-ताशा पथके, डिजे इत्यांदीमुळे विसर्जन मिरवणुका लांबल्या

पुण्यातील जेएम रोडवर पाणीच पाणी

ज्या रस्त्यावर एकही खड्डा नाही अशा जंगली महाराज रस्त्यावर पावसाच्या पाण्याने कहर केला. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. इतकच काय तर पायी जाणाऱ्या नागरिकांना देखील तीन ते चार फुटांपर्यंत आलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली

पीएफआय कार्यालयावर छापे, पुण्यात ऐकू आल्या देशविरोधी घोषणा

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी पुणे येथे पी एफ आय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेवर छापेमारी करण्यात आली. यावेळी काही पदाधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली असल्याने संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकार्यालय समोर निदर्शना करण्यात आली आणि यावेळी देशाविरोधी घोषणा देखील ऐकू आल्या होत्या.

पुण्यातील चांदणी चौक येथील पुल पाडण्यात आला

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल २ ऑक्टबर रोजी पाडण्यात आला. ६०० किलो स्फोटकांचा वापर करून हा पूल पाडण्यात आला. हा पुल पाडण्यादरण्यान अनेकांनी याबाबत मीम्स तयार केल्या आणि सोशल मीडियावर देखील या पुलाची चर्चा रंगू लागली.

ऋतुराजचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण

पुण्यातील ऋतुराज गायकवाड या तरुणाने सरत्या वर्षात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. लखनऊ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या एकदिवसीय सामन्यातून ऋतुराजने एक दिवसीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केले. ऋतुराज ने यापूर्वी आयपीएल आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याची अंतराष्ट्रीय संघात निवड झाली होती

नवले पुलावर अपघातात तब्बल 48 वाहनांचे नुकसान

२४ नोव्हेंबर ही काळ रात्री ठरली कारण याच दिवशी पुण्यातील नवले पुलाजवळ एक भीषण अपघात घडला ज्यात ४८ गाड्यांचे मोठे नुकसान झाले. एका भरधाव वेगात असणाऱ्या ट्रक ने ४० हून अधिक वाहनांना धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. गर्दीच्याच वेळी झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले होते

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर इंक अटॅक

पुण्यातील चिंचवड मध्ये जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. ‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्य निषेधार्थ पाटील यांच्यावर १० डिसेंबर रोजी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती.

अजरामर अभिनय करणाऱ्या "बॅरिस्टर"ची एक्झिट

आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत अनोखा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ७७व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गोखले यांनी अनेक प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक, सिरीयल मध्ये काम केलं.

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे दीर्घ आजाराने पुण्यात ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या लेखणीमुळे त्यांना राज्य सरकार ने अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्ती हरपली

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे वयाच्या ७८व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरात निधन झाले. मराठी साहित्य विश्वात त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्येसुद्धा आपला सहभाग दर्शवला होता.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. आजारी असताना सुद्धा त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com