‘युवा पुरस्कारा’चे वितरण रखडले

‘युवा पुरस्कारा’चे वितरण रखडले
Published on

पुणे, ता. १० : समाजासाठी विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या तरुणांना व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘युवा पुरस्कारा’चे वितरण प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडले आहे. पुरस्काराचे विजेते जाहीर होऊन वर्ष उलटले असले, तरी अद्याप प्रत्यक्ष वितरण झाले नसल्याने विजेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाने २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हास्तरीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले होते. सर्व छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मार्च २०२५ मध्ये पुरस्कारांचे विजेते जाहीर करण्यात आले. मात्र, अद्याप वितरणाची तारीख जाहीर झाली नसल्याने जिल्हा प्रशासन कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे? असा सवाल विजेत्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील १५ ते ३५ वयोगटातील युवक आणि नोंदणीकृत संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी २०१२ च्या ‘युवा धोरणा’अंतर्गत हे पुरस्कार दिले जातात. दरवर्षी एक युवक, युवती आणि संस्था असे तीन पुरस्कार दिले जातात. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र उमेदवारांची निवड करते. प्रत्येक वर्षीच्या एप्रिलमध्ये विजेत्यांची घोषणा आणि १ मे रोजी पुरस्काराचे वितरण जिल्हा प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाने वितरणाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. तसेच, पुरस्कारांसाठी अर्ज मागविणे, पडताळणी आणि प्रत्यक्षात वितरण या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी विजेत्यांकडून केली जात आहे.
---------------
‘‘मागील वर्षी पुलवामा हल्ल्यामुळे पुरस्कारांचे वितरण १ मे २०२५ रोजी न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. तसेच, या वर्षी पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १ मे रोजी वितरण झाले नाही. या संदर्भात समिती निर्णय घेणार असून, पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्यात येईल.
- जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी
---------------
‘‘पुरस्कार जाहीर होऊन एक वर्ष झाले तरी त्याच्या वितरणासाठी जिल्हा प्रशासन कोणता मुहूर्ताची वाट पाहत आहे? अशा दिरंगाईमुळे युवकांना प्रोत्साहन कसे मिळणार? प्रशासनाने आमची दखल घेऊन त्वरित पुरस्कारांचे वितरण करावे.
- प्रवीण मोरे, युवा पुरस्कार विजेते (२०२१-२२)
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com