पुणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रात ३५५ शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Zilla Parishad announced final list of schools difficult terrains of district transfer of teachers

पुणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रात ३५५ शाळा

पुणे : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची अंतिम यादी बुधवारी (ता.२०) जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील ३५५ शाळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांच्या प्राथमिक यादीतील ४१३ शाळा अंतिम यादीतून वगळण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने याआधी १६ मार्च २०२२ ला ७६८ शाळांची प्राथमिक यादी जाहीर केली होती. या प्राथमिक यादीवर २२ मार्च २०२२ पर्यंत शिक्षकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती सुचनांमधील मुद्द्यांची खातरजमा केल्यानंतर ४१३ शाळा वगळण्यात आल्या आहेत.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हानिहाय सुगम व दुर्गम (अवघड व सोपे क्षेत्र) क्षेत्रातील शाळांची तालुकानिहाय यादी तयार करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला होता. यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने या याद्या आता त्या त्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना जाहीर करण्यासाठी पाठवल्या आहेत. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांचे नवे धोरण गेल्या वर्षी राज्य सरकारने जाहीर केले आहे. यामुळे बदल्यांचे जुने धोरण रद्द झाले आहे. मात्र राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग चालू असल्याने, नवीन बदली धोरणानुसार अद्याप एकदाही शिक्षकांच्या बदल्या होऊ शकलेल्या नाहीत.

दरम्यान, अवघड क्षेत्रात सर्वाधिक काळ काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदल्यांच्या वेळी दिलासा देण्यासाठी त्यांना सोप्या क्षेत्रातील शाळांवर नवी नियुक्ती देता यावी आणि अनेक वर्षे सोप्या क्षेत्रातील शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यासाठी या अवघड व सोप्या क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर केली जाते.

पाच तालुक्यात सर्वच सोप्या शाळा

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील तेरापैकी आठच तालुक्यात अवघड क्षेत्रातील शाळा असून उर्वरित पाच तालुक्यातील सर्वच शाळा सोप्या क्षेत्रातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकही शाळा अवघड क्षेत्रात नसलेल्या तालुक्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, हवेली, शिरूर यांचा समावेश आहे.

संकेतस्थळावर याद्या उपलब्ध

पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांच्या तालुकानिहाय याद्या या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुकांना जिल्हा परिषदेच्या www.punezp.mkcl.org या संकेतस्थळावर या याद्या पाहता येणार आहेत.

अवघड क्षेत्र तालुकानिहाय शाळांची संख्या

 • आंबेगाव - ७३

 • बारामती - शून्य

 • भोर - ३६

 • दौंड - शून्य

 • हवेली - शून्य

 • इंदापूर - शून्य

 • जुन्नर - ३५

 • खेड - ३६

 • मावळ - ४८

 • मुळशी - ६७

 • पुरंदर - १७

 • शिरूर - शून्य

 • वेल्हे - ४३

एकूण - ३५५

राज्य सरकारने अवघड क्षेत्राची शाळा निश्‍चित करण्यासाठी एकूण सात निकष निश्‍चित करून दिले आहेत. यापैकी किमान चार निकषांची पुर्तता करणारी शाळा ही अवघड क्षेत्रातील ग्राह्य धरण्यात यावी, असे सरकारने सांगितले होते. या निकषांनुसार पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळा निश्‍चित केल्या आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Web Title: Pune Zilla Parishad Announced Final List Of Schools Difficult Terrains Of District Transfer Of Teachers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top