पुणे 'झेडपी'चे अजित पवार प्रेम अंलगट येणार!

अमोल कविटकर
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना डावलले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. बापट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना डावलले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे. बापट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेत आज कृषी पुस्कारांचे वितरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याच कार्यक्रमात अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. मात्र दुसरीकडे बापट पुण्यात असुनही त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित दिले गेले नव्हते.

या विषयी 'सरकारनामा'शी बोलताना बापट म्हणाले, ''गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या काही कार्यक्रमांना डावलले जात असल्याची बाब माझ्या लक्षात येत होती, पण याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता या विषयी राज्याच्या मुख्य सचिवांना ही बाब कळवणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करणार आहे. शिवाय दबावाला बळी पडून कार्यक्रमांना न बोलावणाऱ्या अधिकाऱ्यांवर विधिमंडळात हक्कभंगदेखील आणणार आहे.

आधीच्या पालकमंत्र्यांच्या काळात जिल्हा परिषदेकडून प्रोटोकॉल पाळले जात होते, मात्र आता का पाळले जात नाहीत? असा सवालही बापट यांनी उपस्थित केला. पुणे जिल्हा परिषदेत गेली अनेक वर्षे निर्विवाद राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शिवाय अजित पवार जिल्हा परिषदेत वैयक्तीक लक्ष घालून कारभार हाकतात. जिल्हा परिषदेच्या बहुतेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना अजित पवारांची जातीने हजेरी असते. मात्र विद्यमान पालकमंत्र्यांना काही कार्यक्रमांसाठी टाळणे, जिल्हा परिषदेच्या अधिकऱ्यांना नवी डोकेदुखी ठरणार आहे. शिवाय दोन राजकीय नेत्यांच्या वादात अधिकारीच हकनाक टार्गेट होणार हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune ZP in problem due to Ajit pawar