#PuneIssue पुण्यात पुन्हा कालवा फुटीचा धोका?

#PuneIssue पुण्यात पुन्हा कालवा फुटीचा धोका?
Updated on

पुणे : भगदाड पडलेल्या भिंती, खचलेला भराव, साचलेला गाळ, कचऱ्याचे ढीग... आणि पुन्हा कधीही, कुठेही भगदाड पडण्याची भीती... हे चित्र आहे. मुठा नदीच्या उजव्या कालव्याचे. गेल्या महिन्यात जनता वसाहत येथे हा कालवा फुटून दांडेकर पूल परिसरातील शेकडो कुटुंबाचे संसारं त्या पाहणी करून आढावा घेतला, तेव्हा कालव्याची दुरवस्था नजरेसमोर आली. 

खडकवासल्यापासून वाहणाऱ्या कालव्याची लांबी 115 किलोमीटर असून, शहरातील त्याची लांबी साधारणतः 46 किलोमीटरची इतकी आहे. या हद्दीत सात लोक राहत असल्याचा अंदाज आहे. 

उजव्या कालव्याला 27 सप्टेंबर रोजी जनता वसाहत येथे भगदाड पडल्याने दांडेकर पूल परिसरातील मानवनिर्मित पुराने शेकडो संसार वाहून गेले. आयुष्याची जमापुंजी पाण्यात वाहून गेली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने जाग आल्याचे सोंग केले खरे पण, ते सोंगच असल्याचे जाणवते. हा कालवा फुटल्यानंतर काल्याव्याच्या स्थितीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहू लागले आहेत. प्रशासनानेही लवकरच काल्याव्याची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, कालवा फुटीला आज एक महिना झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खडकवासला ते जनता वसाहत अशी या कालव्याची पाहणी 'सकाळ'ने केली. 

खडकवासला धरणातून सुरू होणारा हा कालवा शहरातून पुढे दौंड, इंदापूर अशा पुणे जिल्हातील काही तालुक्‍यांना पाणी पुरवठा करतो. कालवा फुटीच्या पार्श्‍वभूमीवर कालव्याचा दुरुस्तीसाठी तो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवासात बंद कालव्याची स्थिती पाहता आली. दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये अनेक ठिकाणी कालवा जर्जर अवस्थेत असल्याचे आढळून आले. कालवा बंद असल्याने त्याची स्थिती गटारासारखी झाली आहे. त्यामध्ये लोकांनी कचरा, मुर्त्या, जुन्या वस्तू टाकल्याचे दिसत होते. तसेच दगड आणि गाळाचे ढीग याचे प्रमाणही प्रचंड होते.

कालव्याच्याकडेला कोठेही संरक्षण भीत किंवा जाळी नसल्याने आणि काही ठिकाणी खचल्याने कालव्याच्या बाजूचा रस्ताही धोकादायक बनलेला आहे. कालव्याच्याकडेने प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आहे. कालव्याच्याकडेने तुम्ही जर शहरात प्रवेश केला तर, तुमचे स्वागत लोकांनी केलेल्या घानीने आणि दुर्गंधीने होणार आहे. कालव्याच्या आसपासची कुटुंबे यामध्ये कपडे, गाड्या, प्राणी धुतात. मुले या पाण्यामध्ये पोहतात. हे पाणी पुढे ग्रामीण भागातील लोकांना पिण्यासाठी, वापरण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. 

खडकवासला येथून या पाहणीस सुरवात केली. सुरवातीच्या काही अंतरावर हा कालवा वेली व जाळ्यांनी व्यापलेला होता. तसेच त्यामध्ये मोठं-मोठी दगडधोंडे पडलेली होती. काही अंतरावरच या कालव्याची जर्जर स्थिती दिसण्यास सुरवात झाली. कालव्याच्या काही ठिकाणी असणाऱ्या सिमेंटच्या भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी भरावाची माती वाहून गेल्याचे. कालव्याची अनेक वर्ष साफसफाई नसल्याने कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा साचलेला आहे. प्रवासाची सुरवात होऊन तीन किलोमीटर देखिल झाली नसतील तर, नांदेड सिटीच्यामागे, या कालव्याचा मातीचा भराव अर्ध्यापेक्षा जास्त वाहून गेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे येथे कधीही कालवा फुटण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. 

नांदेड, किर्रकटवाडी येथून कालव्याची स्थिती मोठ्या प्रमाणात खराब होण्यास सुरवात होते. कालव्यामध्ये गणेश आणि लक्ष्मी मूर्तींचे विसर्जन केल्याचे दिसून आले. भग्न अवस्थेतील मूर्ती जणू आपल्या ठरावीक आस्थेचा पुरावाच होत्या... ज्या गणेशासाठी मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते दहा दिवसासाठी जिवाचे रान करतात तेच बाप्पा मात्र, कालव्याच्या तळाशी शांत पडले आहेत. सिंहगड रस्त्याच्या परिसरात या कालव्याची स्थिती फारच भयंकर असल्याचे दिसून आले. येथे ठिकठिकाणी कालव्याच्या सिमेंटच्या भिंती पडलेल्या आहेत. तर काही ठिकाणचा भराव खचून कालव्यातच त्याचा ढीग साचलेला आहे. भराव खचल्याने कडेचा रस्ताही खचलेला आहे.

या कालव्याची बांधणी खूप जुनी असल्याने त्यावेळी बांधण्यात आलेल्या भीती आता खराब झाल्या आहेत. त्यांची डागडुजी कधी केलेलीच नसल्याचे दिसून आले. शहरातून जाणाऱ्या या कालव्याच्याकडेने मोठ्या प्रमाणात मनुष्य वस्ती निर्माण झाली आहे. ही लोक कालव्याच्या पाण्यावरती अवलंबून असतात. हा कालवा म्हणजे स्त्रियांसाठी कपडे आणि भांडी धुण्यासाठी 'धोबी घाट' तर मुलांसाठी पोहण्याचा 'स्वीमिंग टॅंक' बनलेला आहे. या कालव्याला जनता वसाहतीपर्यंत सहा मोठे धोके आहेत, तर अनेक छोटे धोके आहेत. कालवा फुटल्यानंतर प्रशासन खडबडून जागे होत. पण, ते काही काळासाठीच... कालव्याची तपासणी करून तो दुरुस्त करणार असल्याचे मोठ्या गाजावाजा करत सांगितले. मात्र, एक महिन्यानंतरही या कालव्याची स्थिती जैसे थी वैसेच आहे. प्रशासनाने फक्त जनता वसाहत येथे पडलेले भगदाड घाईघाईत दुरुस्त केले. पण, संभाव्य धोके शोधून त्या ठिकाणांची दुरुस्ती करण्याची बुद्धी त्यांना सुचली नाही. मागील काही दिवसापासून कालव्याच्या दुरुस्तीचे कारण देत कालव्यातून पाणी पुरवठा बंद ठेवलेला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असण्याच्या काळातच पाणी पुरवठा बंद ठेवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके जळत आहेत. तसेच त्यांनाच्या घरासाठी पाणीही मिळत नाही. 

पाहणी दरम्यान कालव्यामध्ये अनेक प्रकारचा कचरा दिसत होता. मात्र, सर्वाधिक कचरा हा आसपास राहणाऱ्या लोकांच्या घरातीलच होता. पाहणी दरम्यान, अनेक ठिकाणी लोक कालव्यात कचरा टाकताना प्रत्यक्षात दिसत होती. नाल्यांमध्ये जुनी कपडे, घरातील ओला व सुका कचरा, ई-कचरा तसेच घातक पदार्थ टाकले जात आहेत. या सर्वांमुळे पुण्यापर्यंत येणारे स्वच्छ पाणी मात्र, पुण्यातून बाहेर पडताना ते किती स्वच्छ राहत असले असा प्रश्‍न पडतो. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे विविध प्रकारे साधारणतः 40 टक्के लिकेज होत असल्याची माहिती समोर आलेली असताना प्रशासनास त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. 

जनता वसाहत येथील कालवा फुटीने दांडेकर पूल परिसरातील शेकडो संसार उघड्यावर आले एक महिन्यानंतरही त्यांच्या डोक्‍यावर छत नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी ही उघड्यावरच होणार आहे. पाहणी दरम्यान शहरातील काही भागात हा कालवा धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे प्रशासनास आणखी किती कालवा फुटी पाहवयाच्या आहेत असा प्रश्‍न पडत राहतो. 

हा कालवा भूमिगत करण्याची मागणी वारंवार होत असताना प्रशासनाने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे. तसेच कालव्याच्या मातीच्या भिंती ऐवजी सिमेंटच्या भिंती बांधण्याची योजनाही खूप दिवसापासून रखडलेली आहे. शहरातून जाणाऱ्या या कालव्याची जबाबदारी पाटबंधारे विभाग महापालिकेकडे सोपवते तर, महापालिका ती जबाबदारी पाटबंधारे विभागाची असल्याचे सांगितले जाते. या दोघांच्या भांडणात कालव्याची स्थिती जर्जर झाली आहे. पण, त्याची चिंता दोन्ही प्रशासनास नाही. हेच आपलं दुदैव...

पुणे महापालिकेने वापरलेल्या पाण्याचे बिल सुमारे दोनशे कोटी रुपये असून त्यातील ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली होती. परंतु ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम मिळाली नसल्याने या कालव्याची दुरुस्ती करता आलेली नाही.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com