वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून सात लाखांचा गंडा

वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून सात लाखांचा गंडा
Published on: 

बनावट चलनाद्वारे व्यावसायिकाला गंडा
पुणे : वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठवून एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी सहा लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत व्यावसायिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून, ते पुणे-सातारा रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. चोरट्यांनी त्यांना वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन पाठविले. दंडाची रक्कम न भरल्यास कारवाईची भीती दाखवून त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर केला. तक्रारदाराच्या बँक खात्यातून चोरट्यांनी पैसे काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात जमा करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास भारमळ तपास करत आहेत.

''पीएमपी''च्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पुणे : भरधाव ‘पीएमपी’ बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज चौकात घडली, तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला. रस्ता ओलांडत असताना भरधाव ‘पीएमपी’ बसने दोघांना धडक दिली होती. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ‘पीएमपी’ चालक पसार झाला आहे. चालक अंकुश गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निहाल विलास पवार (वय २४, रा. नारायण बिल्डिंग, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे, तर रोहन ऊर्फ साहिल सुखदेव घोळवे (वय १८, रा. कात्रज) हा गंभीर जखमी झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल आणि रोहन हे रविवारी (ता. ८) पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे-सातारा मार्गावरील कात्रज चौकातून भाजी मंडईकडे निघाले होते. रस्ता ओलांडत असताना भरधाव ‘पीएमपी’ बसने निहाल आणि रोहन यांना धडक दिली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच निहाल याचा मृत्यू झाला.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गोखलेनगर येथील जनवाडी भागात घडली. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम अनिल जाधव (वय ३०, रा. जनवाडी, जनता वसाहत) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रेवती रमेश गजमल ऊर्फ रेवती प्रेम जाधव (वय २५) आणि मेहुणी रितिका रमेश गजमल (वय ३०, रा. धर्मनगर, अरुण कदम चौक, जनवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रेम यांची आई लक्ष्मी अनिल जाधव यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रेम हा बेरोजगार होता. त्याच्यावर कर्ज होते. त्याची पत्नी आणि मेहुणी त्याला मानसिक त्रास देत होते. याला कंटाळून प्रेम याने ४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल पाटील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.