esakal | पुणेकरांचे वाचले तब्बल एक कोटी रुपये 
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांचे वाचले तब्बल एक कोटी रुपये 

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांची बिले तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आतापर्यंत तपासलेल्या बिलांमध्ये एक कोटी 19 लाख रुपयांचा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. 

पुणेकरांचे वाचले तब्बल एक कोटी रुपये 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सहकारनगर भागात राहणारे 56 वर्षीय सुधाकर एका खासगी कंपनीत काम करतात. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पुणे स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकरा दिवसांमध्ये त्यांना साडेपाच लाखांचे बिल आले. बिल पाहूनच त्यांना धक्का बसला. एवढे बिल भरणे त्यांना अशक्‍य होते. त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली, त्यांच्या बिलाची तपासणी केल्यानंतर त्यांचे बिल चार लाखांपर्यंत कमी करण्यात आले. सुधाकर यांना मिळालेला हा दिलासा शब्दांत वर्णन करता येणारा नव्हता. 

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात सरकारी आकड्यांनुसार 17 हजार 393 जण सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. पुण्यात सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून 9 हजार 758 बेड्‌स उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वाधिक 7 हजार 574 बेडस्‌ हे खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहेत. तर 2 हजार 184 बेड हे विविध शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. पुण्यात एप्रिल महिन्यांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये ही संख्या 17 हजार 820 च्या दरम्यान राहिली. त्यानंतर गेली तीन महिने हा आकडा सतरा-अठरा हजारांच्या आसपास राहिला. या काळात खासगी रुग्णालयाकडून भरमसाठ बिल आकारण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी आल्या. पीपीई किट, आयसीयू चार्जेस, ठराविक कंपनीची ऍन्टिबायोटिक्‍स घेण्याचा आग्रह आणि डिस्पोजेबल गोष्टी अशा कारणांनी बिलांमध्ये भरमसाठ वाढ होत असल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांची बिले तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आतापर्यंत तपासलेल्या बिलांमध्ये एक कोटी 19 लाख रुपयांचा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिलांबाबत नागरिकांमध्ये जागृकता वाढत आहे. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या बिलांची संख्या वाढत असून, त्यात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- डॉ. मनीषा नाईक, सहाय्यक आरोग्यप्रमुख पुणे महापालिका. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल 
बिलांमध्ये पीपीई कीट, हॅण्ड ग्लोज, मास्क, बेड पासून अनेक डिस्पोजल वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी तफावत आहे. एकएका रुग्णाला दररोज अकरा हजार रुपयांचे पीपीई कीट वापरले गेल्याचे बिलांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या वस्तू, ऍन्टिबायोटिक्‍स गोळ्या यांच्या किमती नियंत्रणात आणायला हव्यात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

तपासण्यात आलेली एकूण बिले : 388 
कमी करण्यात आलेली बिले : 245 
बिलांची किंमत : 6 कोटी 97 लाख 
कमी केलेली रक्कम : 1 कोटी 18 लाख 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image