पुणे : कुणी अन्नदानाच्या तयारीसाठी झटतेय, तर कुणी आरोग्य तपासणी करण्यात व्यग्र...काही जण मालिश करून देत आहेत, तर काही जण औषधांचे वाटप करण्यात मग्न... असा वारकऱ्यांसाठीचा अखंड सेवायज्ञ शहरात शनिवारी दिवसभर सुरू होता..पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वैष्णवांची मनोभावे सेवा करीत पुणेकरांनी आषाढी वारीत प्रत्यक्ष सहभागी होता न आल्याची कसर भरून काढली. आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. त्यानिमित्त लाखो वारकरीही शहरात मुक्कामी असतात. त्यांच्या सेवेसाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, गणेश मंडळे, सोसायट्यांनी विविध उपक्रम आयोजित केले. याशिवाय अनेक पुणेकरही स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाले. या उपक्रमांमध्ये अन्नदान, आरोग्य तपासणी शिबिर, चष्मे वाटप, औषध वाटप, वाद्य दुरुस्ती, पाणी वाटप, सरबत वाटप, तेल मालिश आदींचा समावेश होता..बहुतांश दिंड्यांचा मुक्काम शहराच्या मध्यवर्ती भागात असतो. त्यामुळे पेठांमधील अनेक सोसायट्यांमध्ये वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी मांडव टाकण्यात आले होते. मंगळवार पेठेतील रहिवासी गणेश जमदाडे हे गेल्या वीस वर्षांपासून अन्नदानाची सेवा करतात. ते म्हणाले, ‘‘आषाढी वारीत इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. त्यामुळे पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्येच आम्हाला पांडुरंगाचे दर्शन होते. त्यांची सेवा ही विठुरायाची सेवा, अशी माझी भावना आहे. त्यामुळे दरवर्षी आमच्या कुटुंबीयांतर्फे अन्नदानाची सेवा दिली जाते.’’.मैथिली निमकर यांनी स्वयंस्फूर्तीने शिधा वाटपाची सेवा देण्याचा निर्णय घेतला. ‘विविध संस्था-संघटनांचे उपक्रम पाहून मलाही सेवेत खारीचा वाटा उचलण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून मग वारकऱ्यांना पुढच्या प्रवासात आवश्यक असणारा शिधा देण्याचे ठरवले. जवळपास १०० वारकऱ्यांची सेवा करता आल्याचे समाधान आहे,’ असे त्यांनी सांगितले..‘अभिनव कलाभारती’ या संस्थेतर्फे वारकऱ्यांचे पाय दाबून देण्याची सेवा केली जाते. यंदा रामोशी गेट पोलिस चौकी, कामगार मैदान लडकत प्रशाला, नवी पेठेतील विठ्ठल मंदिर, संत नामदेव प्रशाला आदी ठिकाणी दहा हजारांहून अधिक वारकऱ्यांचे पाय दाबून देण्याची सेवा संस्थेच्या २५० कार्यकर्त्यांनी केली. प्रभात तरुण मित्र मंडळ, करण ग्रुप, डेक्कन जिमखाना नागरिक समिती यांच्यातर्फे फर्ग्युसन रस्त्यावरील गोपाळ कृष्ण गोखले चौकात वारकऱ्यांना राजगिरा लाडू, बिस्किटे, भेळ, पाण्याच्या बाटल्या यांचे वाटप करण्यात आले..श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजित शिबिरात ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी उपस्थित होते. या शिबिरात आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे वाटपासह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. अंगदुखी, डोकेदुखी, मधुमेह यांसारख्या आजारांवर मोफत औषधे देण्यात आली. सकाळी १५ हजार वारकऱ्यांना नाश्ता व चहा देण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.