या 'चॉकलेट'मुळे पुण्यात झाले अनेकांचे भाजपप्रवेश !

मंगेश कोळपकर
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या "इन्कमिंग'मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांनी सोमवारी भाजप प्रवेश केला. बापू नाराज असल्याची चर्चा असली तरी ते लगेचच भाजपमधील जातील, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत नव्हते. तर, सोमवारीच विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण यांनीही भाजप प्रवेश करून शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केले.

पुणे : दोन वर्षांवर आलेल्या आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची "डबल' उमेदवारी तर, कोणाला "म्हाडा'पासून अण्णाभाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान या सारख्या विविध पदांचे आमिष दाखवित शहर भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीला शहरात खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या (ता. 17) सभेत आणखी काहीजणांचे प्रवेश होणार असल्याचा दावा शहर भाजपने केला आहे.

भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या "इन्कमिंग'मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांनी सोमवारी भाजप प्रवेश केला. बापू नाराज असल्याची चर्चा असली तरी ते लगेचच भाजपमधील जातील, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत नव्हते. तर, सोमवारीच विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण यांनीही भाजप प्रवेश करून शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केले. गेल्या आठवडाभरात काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सदानंद शेट्टी, सुधीर जानजोत, खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुरेश कांबळे तसेच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील गोगले, किशोर विटेकर, नारायण गलांडे, लहू बालवडकर आदींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हडपसरमध्येही काही कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला आहे.

शहरात काँग्रेसचे सध्या अवघे नऊ नगरसेवक असले तरी, कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. एकेकाळी शहरावर सत्ता गाजविणारा काँग्रेस पक्ष आता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीची अवस्था तुलनेत बरी आहे. मात्र, पक्षातंर्गत स्पर्धेतून आणि भवितव्यासाठी बापू पठारे यांच्यासारखा मोहरा पक्षातून बाहेर पडला आहे. पक्षांतर केलेल्या अनेकांना आमदारकीची आस होती. परंतु, ती मिळणे शक्‍य नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी सत्तापदासाठीचा राजमार्ग म्हणून भाजपची वाट धरली.

महापालिका निवडणूक आता दोन वर्षांवर आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली. त्यामुळे ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढली गेली. त्याचा फायदा भाजपला झाला अन त्यांचे 100 नगरसेवक झाले. आता पुढचीही निवडणूक प्रभाग पद्धतीनेच होण्याची दाट शक्‍यता आहे. भाजप प्रवेश केलेल्यांपैकी अनेकजण माजी नगरसेवक आहेत. भाजपच्या उमेदवारीवर त्यांना नगरसेवक व्हायचे आहे. ज्या भागात पक्षाचे या पूर्वी "नेटवर्क' नव्हते तेथील कार्यकर्ते येत आहेत म्हटल्यावर शहर भाजपने त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत दरवाजे खुले केले.

"महापालिका निवडणुकीत उमेदवारी देऊ', "तुम्हाला नाही देता आली तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला किंवा सुनेला संधी देऊ', "अण्णाभाऊ साठे महामंडळापासून म्हाडापर्यंतच्या अनेक मंडळांवर सदस्य म्हणून घेण्याचा विचार करू', "पक्षाच्या कार्यकारीणीमध्ये संधी देतो', "फक्त काम सुरू करा म्हणजे काही अडचण येणार नाही,' असे सांगत शहर भाजपने त्यांना "चॉकलेट' दाखविले. काही दिग्गजांना तर, "तुमच्या भागातील तिकिटे तुम्ही सांगाल त्यांना देऊ', असेही सांगण्यात आले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सत्तेवर येईल की नाही, याची खात्री नाही, शिवसेनेचे भलतेच काही तरी असते अन बाकी काही पर्याय नाहीत, असा विचार करीत, अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा दरवाजा ठोठावलाय असे सध्या तरी दिसते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punes Congress and NCP leaders enters in BJP before Maharashtra Vidhan Sabha 2019