पुण्यातील फुलबाजार कोमेजला, व्यापारी, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

flower.
flower.

मार्केट यार्ड : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरात फुलांचा व्यवसाय अक्षरशः मोडकळीस आला आहे. शेतमालांसह फुलबाजार ठप्प झाला आहे. व्यवसायाचे चक्र कोलमडले आहे. धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, कार्यक्रम बंद आहेत तर मंदिरात लागणाऱ्या फुलांची मागणीही नगण्य आहे. यामुळे फुलांची मागणी थांबली आहे. फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी आणि फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजारात सध्या फुलांना मागणी अत्यंत कमी आहे. व्यापाऱ्यांनी प्रयत्न करूनही फुलांची विक्री होत नाही. बाजारात सकाळी विक्रीला आलेली फुले दुपारनंतर खराब होतात. सायंकाळी खराब झालेली फुले फेकून द्यावी लागत. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी उत्पादन कमी केले आहे. तसेच आलेल्या मालाचे विकण्याचे टेन्शन आहे. मुंबई, कल्याण, पनवेल, ठाणे, कोकण याभागतून फुलांची मागणी मोठी असायची. परंतु सध्या जवळपास ७० टक्क्यांनी मागणी कमी झाली असल्याचे अखिल फूल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बाजारात पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर, वाई, बावधन, सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, पुणे-सोलापूर रस्त्यावरील हवेली तालुक्यातील गावे तसेच बुलडाणा भागातून फुलांची आवक होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशभरातील विविध धार्मिक स्थळे, विविध मंदिरांना कुलूप लागले आहे. मंदिरातील पूजा-आरत्या साध्या पद्धतीने सुरू आहेत. पूजेतही फुलांचा वापर केला जात नाही. त्याचा परिणाम फूल बाजारावर झाला आहे. फुलांना ग्राहक नसल्याने फुलशेती अडचणी असल्याचे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. 
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे फुलांचा व्यवसाय निम्म्यापेक्षा जास्त घटला आहे. जोपर्यंत मंदिर, कार्यक्रम, दुकानात लागणारे सकाळचे फुलांचे हार याची मागणी सुरू होत नाही. तोपर्यंत फूल व्यवसाय पूर्वपदावर येणार नाही. 
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूल बाजार अडते असोसिएशन 

कोरोनामुळे आधीच फुलशेती संकटात आहे. त्यात सरकारने वीज कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे एकीकडे भाव नाही. तर दुसरीकडे वीज नसल्याने फुलांना पाणी देता येत नाही. त्यामुळे फुलांची झाडे सुकू लागली आहे. यामुळे यवत परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी फुलांसहित झाडे काढून बांधावर फेकली आहेत. 
- अप्पा गोराडे, शेतकरी, यवत 

अशी आहे स्थिती 

  • - ३० टक्क्यांपर्यंत फुलांचे उत्पादन कमी 
  • - ६०-७० टक्के ग्राहक कमी 
  • - शेतकरी, व्यापारी आर्थिक अडचणीत 
  • - मागणी नसल्याने फुलांसहित झाडे बांधावर 
  • - बाजारात फुले आली तर मागणीच नगण्य 

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुलांची आवक आणि उलाढाल 
महिना - आवक (क्विंटल) - उलाढाल (रुपये) 
जानेवारी २०२० - २२,७३४ - १७ कोटी २० लाख १० हजार १५९ 
फेब्रुवारी २०२० - २६,००० - १७ कोटी २७ लाख २८ हजार ३४८ 

जानेवारी २०२१ - २२,३५२ - १० कोटी ८३ लाख ८० हजार ५३६ 
फेब्रुवारी २०२१ - १७, ७०१ - ८३ लाख २९ हजार ४०२ 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com