चार वर्षांत मोडकळीस

प्रयागा होगे
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - वानवडीतून बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जायचे तर १० ते १२ किलोमीटर प्रवास विजय भोसले यांना करावा लागतो. ते आझाद नगर परिसरात राहतात. निवृत्तीनंतर नाटके पाहण्यासाठी वेळ द्यायचे त्यांनी ठरविलेले. प्रत्यक्षात प्रवासाच्या दगदगीने त्यांना नाटक पाहायला जाणे निवृत्तीनंतरही जमत नाही. त्यांच्या भागात महापालिकेने चार वर्षांपूर्वी महात्मा फुले सांस्कृतिक भवन बांधले. मात्र, केवळ एक इमारत इतकेच या भवनाचे अस्तित्व आहे. 

‘माझ्या आठवणीत चार वर्षांत दोन-तीन नाटकांचे प्रयोग या भवनात झाले आहेत. ही प्रायोगिक नाटके होती. व्यावसायिक नव्हती. नाटकांची आवड भागविण्यासाठी माझ्यासारख्या रसिकांना बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हेच पर्याय उरतात,’ असे भोसले सांगतात. रिकामे सांस्कृतिक भवन भोसले यांना अस्वस्थ करते. तेथील फुटलेल्या फरशा, बंद स्वच्छतागृह, मोडक्‍या खुर्च्या त्यांना महापालिकेच्या धोरणांविषयी चीड आणते. 

भोसले यांची प्रतिक्रिया वानवडीतील बहुसंख्य नाट्यरसिकांचे प्रतिनिधित्व करते. पुण्याच्या पूर्व भागातील नागरिकांसाठी बांधलेल्या रंगमंदिरांचा बेरंग झालेला पाहायला मिळतो. सांस्कृतिक भवन बांधताना तेथे नाट्य-संगीतासारखे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, हे गृहीतच धरले गेले नसल्याची जाणीव चेंजिंग रूममधील अपुरा प्रकाश लख्खपणे करून देतो. 

‘‘नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी शालेय कार्यक्रम होतात. स्वच्छतागृहे अत्यंत घाण असतात. पाण्याचीही गळती सुरू असते. नाट्यगृहाचा उपयोग होताना दिसत नाही,’’ अशी भावना भोसलेंप्रमाणेच स्थानिक प्रेक्षक श्‍यामराव चव्हाण व्यक्त करतात. या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची दखल महापालिकेने घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी वारंवार केली. मात्र, महापालिकेला जाग आलेली नाही. 

महापालिकेच्या ताब्यातील नाट्यगृहांतील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवायला पाहिजेत. स्वच्छतागृहे स्वच्छ असली, तर कलाकारांनाही त्याचा वापर करता येतो. महापालिकेने प्रामुख्याने या गोष्टीकडे पाहिले पाहिजे.
- कीर्ती शिलेदार, शास्त्रीय संगीत गायिका 

Web Title: PuneTheatre Issue