शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या

शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या
Published on: 

मोटार चालकाला
मारहाण करून ऐवज लुटला

पिंपरी : रस्त्यालगत मोटारीसह उभ्या असलेल्या मोटार चालकाला तिघांनी मिळून मारहाण करत ऐवज लुटला. ही घटना बंगळूर-मुंबई महामार्गावर बाणेर येथे घडली. या प्रकरणी स्वप्नील सुनील शिंदे (रा. लवळेगाव, ता. मुळशी, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजवीर, साहिल आणि विशाल या नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांनी त्यांची मोटार रस्त्याच्या कडेला थांबवली असताना आरोपी तिथे आले. आरोपी साहिल याने पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी मोटारीची काच खाली करायला सांगून मोटारीची चावी काढून घेतली. त्यानंतर तिघांनी मिळून फिर्यादीला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या पाकिटातील दोन हजारांची रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावला.

तरुणाला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा
पिंपरी : ‘दुचाकी कुठे आहे,’ असे विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या मारून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना तळवडे येथे घडली. या प्रकरणी यासिन इद्रिस शेख (रा. तळवडे, पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोन्या वानखेडे आणि ओमकार चव्हाण (दोघेही रा. रुपीनगर, तळवडे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीला "तुमची दुचाकी कुठे आहे" असे विचारत पाठीमागून डोक्यात व कानावर बिअरच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या मारल्या. त्यामुळे फिर्यादीच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी शिवीगाळ करीत कोणाला सांगितल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली.

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
पिंपरी : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना नेरे येथील मारुंजी रस्त्यावर घडली. निवृत्ती त्रिंबक मोरे (वय ४७ रा. दत्तवाडी, नेरे) असे या अपघात जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश निवृत्ती मोरे (रा. दत्तवाडी नेरे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कासिफ रईस बेग (रा. नेरे, ता. मुळशी) या दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे वडील निवृत्ती मोरे हे रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या दोन्ही हाता-पायांना आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जुगार प्रकरणी दहा जणांवर गुन्हा
पिंपरी : लॉजमध्ये पैशांवर जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली. पिंपरीतील हॉटेल प्रेस्टिज लॉज येथे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दानिश चौधरी, वरनदीप सोडी, नईममुल्ला चौधरी, गुड्डू विश्वकर्मा, रिझवान चौधरी, रवी भरई, मुजाहिर औटी, विनोद डपोलिया, नौशाद शेख आणि हरिश पुजारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण चार लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदा कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा
पिंपरी : बेकायदारित्या कोयता जवळ बाळगणाऱ्या एका रिक्षा चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रहाटणी येथे करण्यात आली. सयाजी दत्ता सालकमवाड (रा. रहाटणी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने त्याच्या रिक्षात एक लोखंडी सुरा जवळ बाळगला होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक कोयता जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com