कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाचा ‘सिक्सर’ हिंजवडी परिसरातील सहा रस्त्यांच्या कामास १ डिसेंबरपासून प्रारंभ

कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाचा ‘सिक्सर’ 
हिंजवडी परिसरातील सहा रस्त्यांच्या कामास १ डिसेंबरपासून प्रारंभ
Published on

पुणे, ता. १७ : हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडीला कायमचा लगाम घालण्यासाठी सहा प्रमुख रस्त्यांचा विकास हाती घेण्यात आला आहे. या रस्त्यांसाठी भूसंपादनाची ६० ते ७० टक्के प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. जमीनमालकांची संमती आणि आगाऊ ताबा मिळविण्यासह निविदा प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, भूसंपादन, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा उच्चस्तरीय आढावा जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या.
हिंजवडी आयटी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी निश्चित केलेल्या सहा प्रमुख रस्त्यांसाठी आखणी, भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेसाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ६० ते ७० टक्के जमीनमालकांची संमती आणि जमिनीचा आगाऊ ताबा मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया तातडीने सुरू केली जाणार आहे. भूसंपादन, हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) धोरण, दोन किलोमीटर परिसरातील निवासी वापराचे नियम तसेच जमीन देणाऱ्यांना लाभांची माहिती देण्यासाठी माण, मारुंजी आणि हिंजवडी येथे गावनिहाय मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असेही आदेश डुडी यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’मधील पाणीपुरवठा तसेच रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. सहा प्रमुख रस्त्यांसोबत आणखी दोन पर्यायी रस्त्यांची शक्यता तपासण्यात येणार आहे. विप्रो चौक, पुनवळे-मारुंजी जोडरस्ता आणि कालव्यालगतच्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कालवा अथवा सिंचन विभागाच्या ताब्यातील जमीन रस्ते विकासासाठी वापरण्याबाबतचा प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत तयार करून, कालवा मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे नियोजन आहे. बांधकाम व्यावसायिक आणि आयटी कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.
------------

‘‘भूमकर चौक, रावेतसह प्रमुख चौकांतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, खड्डे बुजविणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्याच्या उपाययोजना करण्यात येतील. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हलक्या वाहनांसाठी आवश्यक मार्ग खुले करण्याचेही नियोजन आहे.
-जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com