शेतकरी आत्महत्येचे कारण शोधण्याची गरज - व्ही. लक्ष्मीनारायण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - 'देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासंबंधीची पावले समाजाने उचलली तरच देश पुढे जाईल. एखाद्या रोगाच्या मुळाशी आपण जातो; तसेच शेतकरी आत्महत्या का करतो?, या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तरच त्याचे कारण समजू शकेल. प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण शोधले पाहिजे, तरच या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल,'' असे मत माजी सनदी अधिकारी व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले.

शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 26 अनाथ मुलांना प्रतिष्ठानने दत्तक घेतले आहे. यानिमित्ताने "पुण्यजागर' या शैक्षणिक उपक्रमाची सुरवात करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्‌ठल जाधव, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), ऍड. प्रताप परदेशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई उपस्थित होते. पुरंदरे यांच्या हस्ते आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

व्ही. लक्ष्मीनारायण म्हणाले, 'आंध्र प्रदेशात आम्ही आठशे शेतकऱ्यांना एकत्र करून कंपनी स्थापन केली. त्याद्वारे आम्ही त्यांच्या शेतातील माल विकतो. त्यातून त्यांनाही फायदा होतो. जेव्हा शेतकऱ्याचा मुलगाही अभिमानाने म्हणेल, की होय मीदेखील शेती करतो, तेव्हाच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल.''

डॉ. जाधव म्हणाले, 'अनाथ मुलांना शैक्षणिक मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु, नेहमीच सरकारवर मदतीसाठी अवलंबून राहू शकता येत नाही. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे.'' सूत्रसंचालन पराग ठाकूर यांनी केले.

समाजाने शहाणे व्हावे
गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षी 30 तास चालते. तो गणपतीदेखील कदाचित म्हणत असेल, "अरे किती छळणार तुम्ही मला.' एवढ्या वेळ मिरवणूक म्हणजे पैशांची उधळपट्टीच होते. गेल्या वर्षापेक्षा दीड तास जास्त वेळ मिरवणूक चालली, असे वर्तमानपत्रांत छापून येते. आता समाजानेच शहाणे होऊन उधळपट्टी करणाऱ्यांना शहाणे केले पाहिजे. माणसातील माणूसपण जागे करण्याची वेळ आली आहे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punyajagar farmer suicide reason searching v. laxminarayan