esakal | पर्यटन विकासात पुरंदरला प्राधान्य
sakal

बोलून बातमी शोधा

puarandar

पर्यटन विकासात पुरंदरला प्राधान्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सासवड: छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या व आठ शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले पुरंदर आणि परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळांच्या विकासार्थ पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांची पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी मंत्री ठाकरे यांनी कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या होत्या. त्याला अनुसरून कार्यवाही सुरू असल्याची माहिती आमदार जगताप यांना कळविण्यात आली आहे.

राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. समितीच्या माध्यमातून किल्ले विकास व किल्ले पायथा आणि भोवतीच्या ५० कि.मी. परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण करणे, किल्ल्याचा इतिहास समजेल असे फलक, माहिती, चित्रे लावणे, तसेच स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे.

गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलीकॉप्टरच्या साह्याने बिया टाकून नैसर्गिक वनराई विकसित केली जाणार आहे. यात पायाभूत सुविधांचा विकास करीत आनुषंगिक पर्यटन केंद्रेही उभारली जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर आमदार संजय जगताप यांनी या सुकाणू समितीमार्फत पहिल्या टप्प्यात किल्ल्यांच्या संवर्धनात किल्ले पुरंदर व परिसर घेण्याची आग्रही मागणी पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा: पुरंदर तालुक्यात लवकरच गुळ कारखाना : आमदार संजय जगताप

पुरंदरचे सांस्कृतिक वैभव

किल्ले पुरंदरला छत्रपती संभाजीराजेंचे जन्मस्थळ म्हणून महत्त्व आहेच. शिवाय किल्ले परिसरात सासवड येथे संत सोपानदेवांची समाधी आहे. सासवडला अंबाजी पुरंदरे, बाळोबा कुंजीर व इतर सरदारांचे वाडे लक्ष वेधून घेतात. सोनोरीला सरदार पानसे यांचा किल्ले मल्हारगड आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया जेजुरीगडावर आहे. यादवकालीन वास्तुशिल्पकलेचा नमुना भुलेश्वर मंदिर, शंभू महादेवांची सिद्देश्वर, चांगा वटेश्वर, पांडेश्वर, जवळार्जूनची पांडवकालीन मंदिरे याच भागात आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर व कोडीतला आहे. ऐतिहासिक जेजुरीचा अहिल्याबाई होळकर तलाव, पेशवे तलाव, दिवेघाटातील मस्तानी तलाव तालुक्याचे सौंदर्य वाढवितात.

पुरंदर तालुक्यात देश-विदेशांतून भाविक, पर्यटक येतात. अजून विकासाची कामे झाली तर पर्यटन चारपटीने वाढेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किल्ल्यांच्या संवर्धनात व परिसर विकासार्थ किल्ले पुरंदर व परिसर घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

- संजय जगताप, आमदार, पुरंदर

loading image
go to top