पुरंदरच्या डोंगररांगा वणव्यात होरपळल्या

पुरंदरच्या डोंगररांगा वणव्यात होरपळल्या

Published on

परिंचे, ता. ६ : दोन दिवसांपासून दक्षिण पुरंदरमध्ये वणवा लागण्याचे सत्र सुरू असून यामध्ये पुरंदरमधील शेकडो एकर वनक्षेत्र तसेच खासगी क्षेत्र होरपळून निघाले असून डोंगरांमध्ये पेटलेल्या मोठ्या झाडांचे धुराचे लोट अजूनही दिसत आहेत. वणव्यामुळे जैवविविधतेसह अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून वन विभागाने या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करण्याची मागणी पांगारे गावचे माजी सरपंच दामोदर काकडे यांनी केली आहे.
पांगारे गावच्या हद्दीत निष्णाई डोंगर, हरेश्र्वर डोंगर, हरगुडे गावच्या हद्दीत नरसोबा डोंगर, परिंचे हद्दीत नाथाचा डोंगर तसेच पानवडी गावच्या हद्दीतील डोंगररांगा वणव्यात जळून खाक झाल्या असल्याचे पहायला मिळत आहे. या वणव्याचा फटका मांढर, हरगुडे, पांगारे, पानवडी गावांसह वाड्यावस्त्यांना बसला आहे. सुरुवातीला पांगारे गावच्या हद्दीत वणव्याला सुरुवात झाली. पांगारे घाटातील आग विझवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा वणवा पेटला अनेक वेळा फोन करून देखील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे दामोदर काकडे यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून पानवडी डोंगराला लागलेल्या आगीमध्ये असंख्य झाडे झुडपे व करवंदाची झाडे जळून खाक झाली आहेत. पानवडी गावातील जनावरांचा चारा हा संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. पानवडी परिसरातील आग विझवण्यासाठी डॉ. अक्षय भिसे, ज्ञानदेव लोळे, रामदास लोळे, सोमा लोळे, विश्वास कामठे, ज्ञानेश्वर लोळे या सर्वांनी मदत केली.
मांढर परिसरात वणवा खासगी क्षेत्रापर्यंत आला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या वैरण व भाताच्या गंजी जळून गेल्या असून दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याचे दूध व्यावसायिक दत्तात्रेय शिर्के यांनी सांगितले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष तानाजी शिर्के, शिवाजी शिर्के, राजेंद्र शिर्के, धनाजी शेळके, बाप्पू शेळके आदी नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. याच परिसरात ठिकाठिकाणी पाइपलाइन व शेती उपयोगी वस्तू जळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून वन विभागाने या घटनेचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे नेते दत्तात्रेय पापळ यांनी केली आहे. वणवा लावणारा आढळल्यास तातडीने वणवा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

तीव्र डोंगर उतारावर आग आटोक्यात आणण्यासाठी अडचण निर्माण झाली तसेच मोठे गवत व सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग विझवताना अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. वणवा लावणे गुन्हा असून वणवा लावणाऱ्यास एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
-सागर ढोले, वन परिक्षेत्र अधिकारी, पुरंदर तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com