
पुणे विभागात सव्वा लाख लोकसंख्या तहानलेली
पुणे - पुणे विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना आतापर्यंत यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. या गावांमधील १ लाख २३ हजार ४७६ लोकसंख्या पाण्याअभावी तहानलेली आहे. या सर्व लोकसंख्येला टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हे सर्व टॅंकर पुणे, सांगली आणि सातारा या तीनच जिल्ह्यात सुरु आहेत. आतापर्यंत कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर आणि बागायती जिल्हा असलेला कोल्हापूर या दोन जिल्ह्यात आतापर्यंत एकही टॅंकर सुरु झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी कोल्हापूर आणि सोलापूर हे दोन जिल्हे टॅंकरमुक्त जिल्हे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
सद्यःस्थितीत विभागातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५४ टॅंकर सुरु आहेत. या सर्व टॅंकरद्वारे ३६ गावे आणि २५३ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील ९६ हजार ३८० लोकसंख्या ही टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. विभागातील बारा तालुक्यातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे शुक्रवारी (ता. २०) विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
विभागातील एकूण टॅंकरपैकी २५ सरकारी आणि ४५ खासगी टॅंकर आहेत. या गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ७२ खासगी, विहीरी व विंधनविहिरींचे अधिगृहण करण्यात आले आहे. या पाणीटंचाईमुळे १ हजार ८६९ पशुधनाला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.
टॅंकर सुरू असलेले तालुके
आंबेगाव, बारामती, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर (सर्व पुणे जिल्हा), माण, वाई, सातारा, कराड (सर्व जिल्हा सातारा) आणि जत (जिल्हा सांगली).
जिल्हानिहाय टॅंकर, गावे, वाड्या, बाधित लोकसंख्या
पुणे --- ५४ --- ३६ --- २५३ --- ९६३८०
सातारा --- ०८ --- १० --- २९ --- ११४४५
सांगली --- ०८ --- ०८ --- ६० --- १५६५१
कोल्हापूर --- शून्य
सोलापूर --- शून्य
एकूण --- ७० --- ५४ --- ३४२ --- १२३४७६
पुणे जिल्ह्यातील सहा तालुके टॅंकरमुक्त
दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यात एकही टॅंकर सुरु झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हे तालुके सध्या तरी टँकरमुक्त तालुके म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे या सहा तालुक्यात आतापर्यंत कायम टॅंकर सुरू असणाऱ्या इंदापूर व दौंड या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या दोन तालुक्यांसह हवेली, मावळ, मुळशी व वेल्हे हे सहा तालुके टॅंकरमुक्त झाले आहेत.
Web Title: Quarter Of A Million People Are Thirsty In Pune Division
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..