करडई, जवस, मसूर या पर्यायी पिकाची पेरणी कितपत शक्य व फायदेशीर?

करडई, जवस, मसूर या पर्यायी  पिकाची पेरणी कितपत शक्य व फायदेशीर?
Published on: 

कृषी विभागाने विद्यापीठाकडे
मागितला रब्बी पिकांबाबत सल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : रब्बी हंगामात कमी पाऊस आणि सिंचनासाठी पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता करडई, जवस आणि मसूर या पर्यायी पिकांची पेरणी कितपत शक्य व फायदेशीर ठरू शकते, असा प्रश्न कृषी विभागाने विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत (ता. २६) कृषी विद्यापीठाला विचारला. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे विविध अडचणी मांडताना या पिकांबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली.
स्थानिक हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार या पिकांचे योग्य वाण, पेरणीची वेळ, अपेक्षित उत्पादन आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबत कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन कोणते आहे, याची विचारणा करण्यात आली. तसेच या पिकांच्या लागवडीसाठी विद्यापीठाच्या शिफारशी उपलब्ध असल्यास त्यानुसार मार्गदर्शन करण्याची विनंतीही करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर आणि लातूर कृषी विभागांकडून शेतकऱ्यांकडून मिळालेला अभिप्राय आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी बैठकीत मांडण्यात आल्या. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण होणारी संभाव्य प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन विविध प्रकारच्या जमिनींसाठी आपत्कालीन रब्बी पीक नियोजन कसे असावे, याबाबतही सल्ला मागण्यात आला. कमी पाण्यात येणारी पिके, त्यांचे सुधारित वाण, पेरणीची योग्य वेळ आणि आवश्यक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान यांसंदर्भात कृषी विद्यापीठाच्या शिफारशी जाणून घेण्यात आल्या. याशिवाय हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि एक ते ५० गायींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांसाठी या तंत्रज्ञानाचे प्रारूप कसे असावे, या बाबतही मार्गदर्शन मागण्यात आले.

मोसंबी बागांच्या पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना हव्यात
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीच्या बागा आहेत. इतर जिल्ह्यांतही कमी-अधिक प्रमाणात मोसंबीची लागवड केली जाते. हवामान बदलामुळे या बागांमध्ये तीव्र फळगळ आणि डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी तसेच बागांचे आयुष्य वाढवून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
सिंचन, मल्चिंग, संजीवके, रोगप्रतिकारक व प्रतिकूल परिस्थिती सहन करणारे रूटस्टॉक आणि एकात्मिक रोग व्यवस्थापन यांबाबत तत्काळ व दीर्घकालीन शिफारशी देण्याची विनंती करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत मोसंबीच्या बागा टिकवून ठेवण्यासाठी मोसंबी संशोधन केंद्राने उपाययोजनांचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रस्तावात आवश्यक साहित्य, त्याची किंमत, मजुरी आणि उपाययोजनांमुळे होणारे फायदे यांचा तपशील द्यावा, असेही सुचविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com