

पिसाळलेल्या कुत्र्याचा मंगळवेढ्यात धुमाकूळ; आठ जणांना चावा
मंगळवेढा, ता. १४ : शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी दुपारी धुमाकूळ घालत आठ जणांना चावा घेतला. तसेच दामाजी कारखाना बायपास रस्त्यालगतच्या वस्तीवरील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. नगरपालिकेच्या सात कर्मचाऱ्यांनी चार तास शोध घेऊनही कुत्रा हाती लागला नाही. तो उसाच्या शेतात लपल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मुरलीधर चौक आणि चोखामेळा चौक परिसरात कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केला. जखमींनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. डॉ. पूजा पवार यांनी सहा जणांना प्रतिबंधक लस दिली. संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आले. दरम्यान, कुत्र्याने मारवाडी गल्ली, भीमनगर, महिला हॉस्पिटल, स्मशानभूमी, कचरा डेपो, कोर्ट परिसर आणि श्रीराम पार्क परिसरात धूम ठोकली. त्यानंतर कारखाना चौकाजवळील दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून शेजारील उसाच्या शेतात आश्रय घेतला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवूनही तो सापडला नाही.
कोट :
शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. त्यापैकी सहा जणांना ग्रामीण रुग्णालयात कुत्रा चावल्यावरील नियमित प्रतिबंधक लस देण्यात आली असून, पुढील उपचार व पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावरील आवश्यक लसीकरणासाठी त्यांना सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. सहा जणांपैकी दोघांना गंभीर स्वरूपाचा चावा घेतल्याचे आढळून आले आहे.
— डॉ. पूजा पवार, ग्रामीण रुग्णालय, मंगळवेढा