
औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण नको; विकास पासलकर
पुणे : ‘‘औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करून महाराष्ट्रात जातीय विद्वेष निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष विकास पासलकर यांनी दिला. छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १४) डेक्कन जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पासलकर म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मोत्सवाला व्यापक स्वरूप येत असून, १४ मे हा छत्रपती संभाजी राजांचा जन्मोत्सव दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात यावा. सहा भाषा पारंगत असलेल्या संभाजी राजे यांनी अनेक ग्रंथ लिहिले.
औरंगजेब, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्या आक्रमणांचा शौर्याने संघर्ष करीत शत्रूंच्या मनात धडकी भरवली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार केला. संभाजी राजांनी त्यांची पत्नी येसूबाई यांना प्रशासकीय हक्क आणि अधिकार देवून राज्यकारभार करण्यास प्रोत्साहन दिले. अशा विद्वान आणि युद्ध कलेत पारंगत असलेल्या छत्रपती संभाजी राजांचा खरा इतिहास प्रत्येक घराघरांत आणि तरुणांपर्यंत पोचला पाहिजे.’’
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, तहसीलदार तृप्ती कोलते, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, दूध संघाचे संचालक भगवानराव पासलकर, उद्योजक बाळासाहेब पासलकर, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, बाळासाहेब बोडके, राजेंद्र पवार, प्रशांत धुमाळ, विराज तावरे, मंदार बहिरट, नीलेश इंगवले, राजाभाऊ पासलकर, श्रीकांत बराटे, भगवान कडू, बाळू जोशी, मयूर शितोळे, जितेंद्र कोंढरे, जितेंद्र साळुंके, बिभीषण निवंगुणे आदी या वेळी उपस्थित होते.
सध्या महाराष्ट्रात काही जणांकडून जाणीवपूर्वक जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही खालच्या प्रकारची टीका करण्यात येत आहे. परंतु मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे जातीयवादी शक्तींचा उद्देश सफल होऊ देणार नाहीत. - विकास पासलकर, संस्थापक अध्यक्ष- अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या आदर्शामुळे महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वलस्थानी आहे. नव्या पिढीने छत्रपतींच्या स्वराज्याच्या संकल्पनेचा विसर पडू नये. छत्रपतींनी दिलेली स्वराज्याची देण ही प्रत्येकाने मनात आणि वर्तणुकीत ठेवली तर संभाजी राजांचा जन्मोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल.
- तृप्ती कोलते, तहसीलदार, हवेली तालुका
Web Title: Racial Hatred In Maharashtra No Exaltation Aurangzeb Tomb Vikas Pasalkar Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..