राफेलबाबत चौकशी करून काही साध्य होणार नाही - माधव गोडबोले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे - बोफोर्स गैरव्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फत करूनही, त्यातून काही समोर आले नाही. आतापर्यंत अनेक प्रकरणांबाबत संसदीय समित्या नेमल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राफेलबाबत संसदीय समिती नेमून, चौकशी करूनही काही साध्य होणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी रविवारी व्यक्त केले.

चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा "राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार' परमवीरचक्र विजेते संजय कुमार यांना रविवारी (ता. 10) गोडबोले यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र आणि पंजाबचे माजी पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, सरहद संस्थेच्या विश्वस्त सुषमा नहार, इंदापूर नगर परिषदेच्या अध्यक्षा अंकिता शहा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता आदी उपस्थित होते. याप्रसंगी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही विद्यार्थ्यांना शहर पातळीवर "चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

गोडबोले म्हणाले, 'राफेल कराराबाबत एकट्या संरक्षण मंत्रालयाने बोलणी करणे अपेक्षित होते. मात्र, पंतप्रधान कार्यालयानेही बोलणी केल्याने संबंधित कंपनीला या दुहेरी बोलणीचा फायदा झाला.''

टूजी गैरव्यवहाराची चौकशी करताना संसदीय समितीच्या अधिकारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत समितीला पंतप्रधानांची चौकशी करू शकत नाही, असे तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितल्याने समितीच्या अधिकारावर प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यामुळे राफेलची चौकशी करून काहीच निष्पन्न होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या देशातील सरकारी संस्थांवर विश्‍वास राहिला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी संजय कुमार यांची मुलाखत अनुराधा प्रभू देसाई यांनी घेतली. कुमार यांनी त्यांचा जीवनप्रवास आणि कारगिल युद्धातील प्रसंग सांगितला. या वेळी कारगिल युद्धावरील चित्रफीत दाखविण्यात आली.

Web Title: rafael inquiry madhav godbole