esakal | चित्रनिर्मितीच्या प्रवासाची ‘साठी’
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Paranjape

चित्रनिर्मितीच्या प्रवासाची ‘साठी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- राहुल देशपांडे

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे हे आज (८ ऑक्टोबर) वयाची ८५ वर्षे पूर्ण होऊन ८६ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यांच्या चित्रनिर्मितीच्या कारकिर्दीस ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त...

‘सुंदर ते वेचावे आणि सुंदर करोनी मांडावे स्व-इतरांसाठी’ हे ब्रीद ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी आयुष्यभर जपले. चित्रनिर्मितीच्या नवीन शक्यतांचा शोध घेत असताना त्यांना खुणावणाऱ्या निरनिराळ्या सर्जनक्षितीजांना ते आजही प्रतिसाद देत आहेत. या सर्जन प्रवासाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. नावीन्याच्या शोधात असलेला एक शैलीदार कलाकार अशी परांजपे यांची ओळख बनली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीसच त्यांना स्व-शैलीची बीजे गवसली व पुढे त्याला व्यासंगाची जोड देत त्यांनी शैलीला अनेक पैलू पाडत गुणवत्तापूर्ण चित्रनिर्मिती केली. फाईन आर्ट कला शाखेचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ‘उपयोजित कलेत’ फार मोलाचे योगदान तर दिलेच; परंतु पुढील काळात वेगळ्या धाटणीची पेंटिंग्स करून आपल्या चित्र प्रदर्शनातून जाणकार व रसिकांची पसंतीची पावतीदेखील मिळवली. याखेरीज लेखन हा त्यांचा तिसरा पैलूही खूप महत्त्वाचा आहे. आपल्या डोळस चिंतनातून त्यांनी कला, कलाइतिहास, समाज व कला संबंध, कला व राष्ट्रनिर्मिती यांचे नाते, कला व संस्कृतीबंध, सुव्यवस्था, प्रणाली व सौंदर्यविचार यांचा अन्योन्यसंबंध एका सुदृढ समाज निर्मितीसाठी किती महत्त्वाचा असतो, हे आपल्या लेखनातून मांडले.

परांजपे यांनी १९६० मध्ये व्यावसायिक कारकीर्द सुरू केली, त्यावेळेस भारतात आधुनिक कला स्थिरावली होती. कलाशिक्षणात त्याचा शिरकाव झाला होता. अशा परिस्थितीत परांजपे यांनी सजगतेने आधुनिक कलेचा अभ्यास करून त्यातील कला परंपरेला पोषक विचारांचा स्वीकार केला व आधुनिक कलेतील सकारात्मक मूल्ये आपल्या कलाविष्कारातून सादर केली. परंपरा व नवता यांचा संगम असलेल्या या कलाप्रवासात त्यांनी आधुनिक कलेने बहाल केलेले निर्मितीस्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगलेले जाणवते.

कलाकारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेले बदल त्यांच्या चित्रातून जाणवतात. बोधचित्रकार म्हणून कार्यरत असताना नावीन्याची आवश्यकता आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टींची असलेली बांधिलकी पेंटिंग करतानाही त्यांनी जपली. भारतीय पारंपारिक लघुचित्रे आणि लोककलांच्या प्रेरणेतूनही त्यांनी चित्रनिर्मिती केली आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत हा त्यांचा आणखी एक प्रेरणास्रोत. त्यातील सूर, लय, ताल या मूळ घटकांच्या संवादातून सौंदर्यनिर्मिती हे तत्त्व त्यांना महत्त्वाचे वाटते. पवित्रता, अस्सलपणा व भारदस्तपणा हे तीनही निकष संगीतात कायमच महत्त्वाचे असतात. याखेरीज परंपरा आणि नवता यांचे नाते शास्त्रीय संगीतातून स्पष्ट झाले, जे सर्वच कलाकारांसाठी महत्त्वाचा संदेश देणारे ठरते. सौंदर्यदृष्टीमुळे होणाऱ्या व्यापक चांगल्या परिणामांची जाण असल्याने ते सौंदर्यग्रही आहेत. त्यांच्या कलाकृतींतून आणि लेखनातून त्यांचे प्रतिबिंब स्पष्टपणे जाणवते. तरुण चित्रकारांसाठी त्यांचे चित्र-विचार, संचित प्रेरणादायी ठरते ते यामुळेच.

loading image
go to top