

सकाळ वृत्तसेवा
जालना, ता. १४ : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांचा अपमान केला. खालची पातळी गाठून त्यांनी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान केला. राहुला गांधी यांनी केलेला हा पोरकटपणा यापूर्वी कोणी केलेला नव्हता. गल्लीतील नेतेही असे वागत नाहीत. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासोबत माजी खासदार संदीप दीक्षित हेही होते. या दोघांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
येथे आज पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
दिल्लीत रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना परदेशी नेत्यांना मिठी मारण्याच्या कृतीची आणि मुत्सद्देगिरीची नक्कल केली होती. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मंचावर एका नेत्याला मिठी मारून दाखवले आणि या धोरणाची खिल्ली उडवली. त्यावर फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे, असे विधान केले होते. यावर फडणवीस म्हणाले, ‘‘सुप्रिया सुळे काहीही म्हणू शकतात. परंतु, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु, २०२४ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल पाहता सर्वोच्च न्यायालयदेखील असाच निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे.’’
मराठवाडा दुष्काळमुक्त करणार
कोल्हापूर, सांगली परिसरातील पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त ३५ टीएमसी पाणी उजनी धरणात आणून ते मराठवाड्यात आणले जाणार आहे. यासोबतच पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राकडे वाहून जाणारे ८० टीएमसी पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढू. पुढच्या पिढीला दुष्काळमुक्त मराठवाडा दिसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.