

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२ : ‘देशाशी खोटे बोलणे बंद करा’, असा आक्रमक पवित्रा घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले.
‘मोदीजी, या देशाशी खोटे बोलणे बंद करा. तुम्ही विदेशी मदतीमुळे पंतप्रधान झाला आहात आणि आजही विदेशी मदतीमुळेच पंतप्रधानपदावर आहात. तुमची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे विदेशी लोकांच्या नियंत्रणाखाली आहे आणि त्यांच्या पाठिंब्यावर चालते. विदेशी सोशल मीडिया पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. या मुद्यावरून मी तुम्हाला खुल्या चर्चेचे आव्हान देत आहे. व्यासपीठ कोणतेही असो, वेळ कोणतीही असो. हिंमत असेल तर या,’ अशा भाषेत राहुल गांधी यांनी आज ‘एक्स’वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींना चर्चेचे आव्हान दिले. ‘तुम्ही चर्चेसाठी कधीच धजावणार नाही. कारण माझ्याकडे तुमच्याबद्दल जी माहिती आहे, त्याला तुम्ही खूप घाबरता, अशीही पुस्ती राहुल गांधी यांनी जोडली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा आणि निवडणुकांमधील मतांच्या कथित चोरीच्या मुद्यांवरुन राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी कटुता पराकोटीला पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील विरोधी पक्ष ज्ञानेशकुमार आणि मतचोरीच्या मुद्यांवरून देशात अराजक निर्माण करीत असल्याचा भाजपचे सर्व बडे नेते गेल्या काही आठवड्यांपासून आरोप करीत असून लोकशाही वाचविण्यासाठी पदयात्रा काढत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये मतांची चोरी करून भाजप लोकशाही संपुष्टात आणत असल्याचा आरोप काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.