उरुळी कांचन येथील दारूभट्ट्यांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व हवेलीतील शिंदवणे व सोरतापवाडी गावांच्या सीमेवर असलेल्या राठोड वस्ती येथे गावठी दारूभट्ट्या सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांना मिळाली.

उरुळी कांचन - लोणी काळभोर पोलिसांनी शिंदवणे (ता. हवेली) गावच्या हद्दीतील राठोड वस्ती येथे ३ गावठी दारूभट्ट्या उधवस्त करून सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व हवेलीतील शिंदवणे व सोरतापवाडी गावांच्या सीमेवर असलेल्या राठोड वस्ती येथे गावठी दारू भट्ट्या सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी गरुड यांच्यासमवेत उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी व लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे श्रीकांत इंगवले, पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, सहाय्यक फौजदार मोहन पानसरे, अनिल तांबे, विकास लगस, सचिन पवार, मच्छिंद्र भगत, रामदास जगताप, राकेश मळेकर, वैशाली चांदगुळे गौरी क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये तीन दारूभट्ट्या उद्वस्त करून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, तयार दारू व इतर साहित्य असे एकूण ६० हजार रुपयांच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली. तसेच या दारूभट्ट्या चालवणाऱ्या पंकाबाई राठोडसह आणखी ५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरारी आहेत. 

पूर्व हवेलीमध्ये वारंवार कारवाई करून देखील छुप्या पद्धतीने अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र आगामी काळात या सर्व अवैध धंद्यांना आळा घालून संबंधितांवर कडक कारवाईचा बडगा उभारणार आहे. 
- सुहास गरुड, उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली.

मागील दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करून १७ हजार १५० लीटर तयार दारू, ४३ हजार लीटर दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, १० वाहने व इतर साहित्य असा एकूण २२ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तरीदेखील मंगळवारी झालेल्या कारवाईमध्ये या ठिकाणी गावठी दारू निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे. यावरून राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिस या दोन्ही विभागांची गावठी दारूभट्ट्या चालकांना भीती राहिली नाही.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raids on liquor furnace at Uduli Kanchan