अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही विक्रमी २ लाख ८१ हजार ३७७ कोटींची तरतूद
मुंबई-पुण्यासाठी हायस्पीड रेल कॉरिडॉर
रेल्वेसाठीही विक्रमी दोन लाख ८१ हजार ३७७ कोटींची तरतूद
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी दोन लाख ८१ हजार ३७७ हजार कोटींची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या सात हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा रेल्वेसाठी केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. रेल्वे मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या तरतुदीत रेल्वे पायाभूत सुविधा, नवीन गाड्या, प्रवासी सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.
उद्योग, बंदरे आणि दळणवळण क्षेत्राला मोठा फायदा पोहोचविण्याची क्षमता असलेला दानकुनी ते सूरत या मालवाहतुकीसाठी समर्पित पूर्व–पश्चिम नवीन कॉरिडॉरची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. अपघात टाळणे आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षा आणि तंत्रज्ञानावर भर देण्यात आला असून स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली ‘कवच ४.०’ अधिक मार्गांवर लागू केली जाणार आहे. तोट्यातील किंवा सीमावर्ती भागातील रेल्वे मार्गांसाठी तसेच रेल्वे कर्जावरील व्याज भरण्यासाठी सरकारकडून निधी दिला जाईल.
वंदे भारतचा विस्तार
अर्थसंकल्पात वंदे भारत, अमृत भारत एक्सप्रेस यांसारख्या आधुनिक गाड्यांच्या विस्ताराला प्राधान्य देण्यात आले असून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, स्वच्छता, डिजिटल सुविधा, प्रवासी सोयींवर भर देण्यात आला आहे. समतोल विकासासाठी लहान व मध्यम शहरांमध्ये रेल्वेचा विस्तार करण्यात येणार आहे. वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे सेवा, नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण, सिग्नल सुधारणा माध्यमातून रेल्वे पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहेत.
केंद्र सरकारच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी देण्यात आलेला निधी रेल्वे चालवणे, कर्मचाऱ्यांचा खर्च, पेन्शन तसेच नवीन रेल्वे लाईन, डबे, सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाचा दैनंदिन खर्च आणि नवीन कामांसाठी भांडवली खर्चासाठी एकूण २ लाख ८१ हजार ३७७ कोटींची एकूण निव्वळ अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या दैनंदिन खर्चात कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते (१ लाख २३ हजार २२४ कोटी), निवृत्तीवेतन (७४ हजार ५०० कोटी), रेल्वे इंजिनसाठी डिझेल (७ हजार ९०४ कोटी), इलेक्ट्रिक रेल्वेसाठी वीज (२५ हजार १८३ कोटी), रेल्वे दुरुस्ती व देखभाल साहित्य (११ हजार २१९ कोटी), कंत्राटी सेवा व कामे (१५ हजार १५७ कोटी), रेल्वेला वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे हप्ते (३५ हजार १३० कोटी) मिळून एकूण निव्वळ चालू खर्च सुमारे १ लाख ७३ हजार ५७७ कोटी आहे.
रेल्वेच्या नवीन पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांसाठी केल्या जाणाऱ्या सुमारे २ लाख ७७ हजार ८३० कोटींच्या एकूण भांडवली खर्चात नवीन रेल्वे लाईन (३६ हजार ७२२ कोटी), रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण (३७ हजार ७५० कोटी), गेज परिवर्तन (४ हजार ६०० कोटी), रेल्वे डबे, इंजिने व वॅगन्स (५२ हजार १०९ कोटी), रेल्वे रुळांचे नूतनीकरण (२२ हजार ८५३ कोटी) पूल आणि बोगदे (२ हजार ५५८ कोटी), सिग्नल व कवचसह दूरसंचार व्यवस्था ( ७ हजार ५०० कोटी), विद्युतीकरण प्रकल्प (५ हजार कोटी), रोड ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज ( ८ हजार २२५ कोटी), लेव्हल क्रॉसिंगवरील सुरक्षा कामे (८०० कोटी), वर्कशॉप व उत्पादन युनिट्स (३ हजार ८८८ कोटी) यांचा समावेश आहे.
नवे रेल कॉरिडॉर
दिल्ली - वाराणसी
वाराणसी - सिलिगुडी
मुंबई - पुणे
पुणे - हैदराबाद
हैदराबाद - चेन्नई
हैदराबाद - बंगळूर
चेन्नई - बंगळूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

