
Pune News : रेल्वेने फलाट बदलला आणि दिव्यांगांना करावी लागली कसरत
कोथरुड : दिव्यांगांसाठी आयोजित केलेली राष्ट्रीय स्तरावरील व्हीलचेयर बास्केटबॉल आठ तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या नंतर आयोजकांनी स्पर्धकांना पुणे रेल्वे स्टेशनवर त्यांच्या नियोजित प्लॅटफॉर्म वरती सोडले.
ज्या गाडीचे आरक्षन होते त्या गाडीच्या आरक्षन नोंदी नुसार प्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येणार होती. परंतु काही कारणास्तव ती गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर न येता अचानकपणे चार वरती येण्याचं जाहीर केल्याने दिव्यांगांची धावपळ झाली. प्रयत्न करुनही गाडी चुकल्याने मानसिक धक्का बसलेल्या दिव्यांगांना रेल्वे अधिका-यांनी दुस-या गाडीत बसवून दिले तेव्हा दिलासा मिळाला.
पुण्यामध्ये व्हीलचेअर बास्केट बॉल खेळायला आलेल्या दिव्यांग खेळाडूंना रेल्वे प्रवासात या दिव्य अनुभवाला सामोरे जावे लागले. परिस्थितीशी झुंज देत ताठ मानेने जगू पाहणा-या दिव्यांगांनी रेल्वे प्रवासाता झालेल्या त्रासाबद्दल सकाळ कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. रेल्वे प्रवास आमच्यासाठी सुकर ठरेल तो दिवस सुवर्ण क्षणाची अनुभूती देणारा असेल अशी भावना व्यक्त केली.
इनब्लेअर संस्थेचे अमोल शिनगारे म्हणाले की, ही गाडी कर्नाटक राज्यात जाणारी होती. त्यामधून पाच दिव्यांग खेळाडूंना जायचे होते. हे खेळाडू या गाडीला चार नंबर फलाटावर पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. परंतु रेल्वे स्टेशनवर लिफ्ट आणि कोणतीही अद्यावत सेवा नसल्यामुळे दिव्यांग खेळाडूंना अखेर रेल्वे क्रॉसिंग वरून जाण्यासाठी मजबूर व्हावं लागलं.
रेल्वे क्रॉसिंग फ्लॅट क्रमांक एक वरून दोन वर गेले असता मध्येच मोठी मालगाडी असल्यामुळे ती रेल्वे ओलांडून जाणे त्यांच्यासाठी मुश्किलीचे झाले आणि जी नियोजित गाडी होती ती त्यांना मिळाली नाही. थोड्या वेळाने रेल्वे अधिकारी आले आणि त्या दिव्यांग खेळाडूंना दुसऱ्या गाडीमध्ये बसवण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली. ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब.
भाग्यश्री मोरे म्हणाल्या की, रुळ ओलांडण्यासाठी उतरता येत नसल्याने प्रथम मला माझाच खुप राग आला. ऐनवेळी फलाट का बदलतात. त्याचा इतरांवर काय परिणाम होईल याचा विचारच हे करत नाहीत. प्रवासात आम्हाला नेहमीच खुप त्रास होतो. रेल्वेच नव्हे अगदी बीआरटीमध्ये सुध्दा तेच होते. व्हीलचेअरला जाण्यासाठी जागा नाही. काही ठिकाणी दिव्यांग जाण्यासाठी फलक लावलेत पण फक्त नावापुरते काम केले जाते. आपल्याकडे भरपूर सुधारणा करणे गरजेचे आहे.
लोणावळा येथे राहणारी मयुरी बोत्रे म्हणाली की, गाडी सुटेल या भितीने पटकन रेल्वेत चढायला आम्हाला खुप जड जाते. बरेचदा माझा प्रवास एक्सप्रेस किंवा लोकलनेच असतो. लोकललाही काही स्टेशनवर फलाट आणि गाडी यामध्ये खुप अंतर असते. त्यामुळे व्हील चेअरवाल्यांना रेल्वेत चढणे वा उतरणे अवघड होते.
व्हिलचेअर क्रिकेटर रमेश सरतापे म्हणाले की, रेल्वेतील स्वच्छतागृहे खराब आहेत. जे व्हीलचेअरवर प्रवास करतात त्यांना स्वच्छतागृहात जाता येत नाही. बसण्यासाठी असलेल्या जागेपर्यंत पोहचणेही अवघड असते.
दिव्यांगासाठी रेल्वेचा प्रवास अवघड आहे दिव्यांगांना रेल्वे प्रवास भाड्यात सवलत असली तरी दिव्यांगांच्या कोच मध्ये रेल्वे कर्मचारी प्रवास करतात. दिन्यांगांना त्याचा उपयोग होईल यादृष्टीने सोय व्हावी. दिव्यांग स्नेही रेल्वे होईल तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण क्षण असेल.