पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील स्थानकांची कामे धिम्या गतीने

railway
railway

मांजरी : रेल्वेने मोठ्या दिमाखात सुरू केलेली पुणे-दौंड मार्गावरील इमु (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) व डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) ची सेवा अगोदरच रामभरोसे, त्यातच या मार्गावरील तीन स्थानकांची उंची वाढविण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या उदासिनते विरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. 

पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम होऊनही ""इमु'' अद्यापही पूर्ण क्षमतेने धावू शकली नाही. ""डेमू'' चीही सेवा संथ गतीने सुरू आहे. त्यातच मांजरी, खुटबाव व कडेठाण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम अतीशय संथ गतीने सुरू आहे. दीड वर्षापूर्वी सुमारे बारा कोटी रूपयांचा निधी येवूनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कामामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. जुना प्लॅटफाॅर्म उखडून ठेवलेले आहेत. प्रतिक्षा शेड व त्यातील आसणे तुटलेली आहेत. दोन्ही बाजूच्या प्लॅटफाॅर्मवर राडारोडा पडला आहे. त्यावर बसूनच प्रवाशांना रेल्वेची प्रतिक्षा करावी लागत आहे. रेल्वेत चढ-उतर करताना या राड्यारोड्यातून अडथळ्यांची शर्यत करावी लागते. खुटबाव येथील एका बाजूच्या प्लॅटफाॅर्मचे काम झाले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी येथील कामही अपूर्णच असल्याचे प्रवासी सांगत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या लालफितीच्या कारभाराचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

2007 मध्ये विद्युतीकरणाच्या माध्यमातून लोकल सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले. ते पूर्ण होण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, नियोजनशून्य कारभारमुळे ही सेवाही पूर्ण क्षमतेने देण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलेले नाही. पुणे ते दौंड या सुमारे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या अंतरात असलेली रेल्वेस्थानके अपूरी आहेत. या मार्गावरून दररोज वीस हजारांच्या असपास प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामध्ये विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगार, नोकरदार मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवास करीत आहेत. या सर्वांना सध्या जीव मुठीत घेऊन प्लॅटफाॅर्मवर वावरावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या बाबी गांभिर्याने घेवून सर्वच रेल्वेस्थानकावरील प्लॅटफाॅर्मचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

"मला दररोज नोकरी निमित्त मांजरी रेल्वेस्थानकाहून पुणे स्टेशन व तेथून पुढे खडकी येथे जावे लागते. प्लॅटफाॅर्मवर असलेल्या दुरवस्थेमुळे उन, पावसात रेल्वेची प्रतिक्षा करीत थांबावे लागते. येथे पडलेल्या राड्यारोड्यामुळे रेल्वेत बसताना वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असतो.''
- मोहमंद शोएब, नोकरदार

"रेल्वेचा स्वतंत्र पुणे विभाग होऊन बावीस वर्षे झाली आहेत. शंभरच्या वर अधिकारी येथे काम करीत आहेत. मात्र, जो विकास होणे अपेक्षीत होते तो अद्यापही झालेला नाही. वारंवार मागण्या करूनही प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत. निधी मिळूनही नवीन कामांबरोबरच साध्या दुरूस्तीच्या कामांनाही मोठा विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयिंना सामोरे जावे लागत आहे.''
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

"सध्या तीन ठिकाणी प्लॅटफॉर्मचे काम चालू आहे. फेरनिविदा काढल्याने थोडा उशीर झाला आहे. मात्र आता हे काम वेगात सुरू असून खुटबाव येथील काम फेब्रुवारी अखेर तर मांजरी व कडेठाण येथील प्लॅटफॉर्मचे काम मार्चअखेर पूर्ण होईल.''
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग 

- 1985-87 दरम्यान मांजरी रेल्वेस्थानक केंद्रीय मंत्री माधवराव शिंदेकडून विकसीत
- 1996 ला रेल्वेचा पुणे विभाग स्थापन
- 2017 ला रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण
- स्टेशन मास्तर व तिकीट घरांची कमतरात
- शंभरच्या वर अधिकारी असूनही दुर्लक्ष
-वारंवार रद्द होणाऱ्या रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com