इंदापूर, बारामतीत पावसाचा द्राक्ष पिकाला दणका 

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

लांबलेल्या व अति झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा उरलासुरला खरीप हिसकावून घेतला. त्यात नगदी पीक असलेल्या द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इंदापूर व बारामती तालुक्‍यात हे नुकसान कोट्यवधी रुपयांचे आहे.

भवानीनगर (पुणे) : ""द्राक्षबागा लावायला सुरूवात केल्यापासून गेल्या 36 वर्षात असं नुकसान आम्ही कधीच पाहिलं नव्हतं... 2014 ची गारपीट परवडली, एवढे मोठे नुकसान यंदा झालं... प्रत्येक बागेचं वेगवेगळ्या कारणांनी झालेले नुकसान पाहिले; तर नेमके काय मांडायचं, हेच समजत नाही,'' पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत 80 एकर बागेचे द्राक्ष उत्पादक व निर्यातदार रामचंद्र शिंदे यांनी माहिती दिली. 

लांबलेल्या व अति झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातचा उरलासुरला खरीप हिसकावून घेतला. त्यात नगदी पीक असलेल्या द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इंदापूर व बारामती तालुक्‍यात हे नुकसान कोट्यवधी रुपयांचे आहे. सन 2014 ची गारपीट, गेल्या तीन वर्षापूर्वी पावसाने झालेले नुकसान भरून काढताकाढता नाकी नऊ आलेल्या द्राक्ष उत्पादकांना या वेळच्या पावसाने मोठा दणका देत हवालदिल करून सोडले आहे. 

फळकूज, घडकूजीने द्राक्ष उत्पादक रडवेले झाले आहेत. गोड्या बहारातील अगाप हंगामाबरोबर 5 ऑक्‍टोबरपर्यंतच्या छाटणीतल्या द्राक्ष बागांना या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीने झटका दिला. या नैसर्गिक आपत्तीने या वर्षी द्राक्षाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे दिसत आहेत. इंदापूर व बारामती तालुक्‍यातील 6 हजार एकर द्राक्ष बागा टप्प्याटप्प्याने या नैसर्गिक आपत्तीच्या नजरेत आल्या आणि नुकसानग्रस्त झाल्या आहेत. 

तंबाखूची पाने खाणाऱ्या लष्करी अळीने घड खाण्यास सुरवात केल्यानंतर त्यातून कसेबसे बाहेर पडलेल्या द्राक्षबागांमध्ये मागील पंधरा दिवसांपूर्वी डाऊनीचा प्रादुर्भाव झाला व अगाप हंगामातील बागा या डाऊनीला बळी पडल्या. त्यानंतरच्या काळातही पाऊस कायम राहिल्याने औषध फवारण्यांचा भडिमार केलेल्या द्राक्ष उत्पादकांना उत्पादन खर्चात मोठी वाढ करावी लागली. यापूर्वीच्या नुकसानापेक्षा या वेळचे नुकसान मोठे असल्याचे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to grape crop in Baramati, Indapur taluka