इंदापुरात अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

इंदापूर तालुक्‍याला परतीच्या व अवकाळीच्या पावसाने झोडपल्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.  शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च परवडत नाही. उत्पन्नाची हमी नसल्यामुळे "आहे त्या परिस्थितीमध्ये' सुमारे 500 एकर द्राक्ष बागा सोडून दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा एकरी दोन लाख रुपये केलेला खर्च वाया गेला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. 

वालचंदनगर (पुणे) : गेल्या महिन्यामध्ये इंदापूर तालुक्‍याला परतीच्या व अवकाळीच्या पावसाने झोडपल्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.  शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च परवडत नाही. उत्पन्नाची हमी नसल्यामुळे "आहे त्या परिस्थितीमध्ये' सुमारे 500 एकर द्राक्ष बागा सोडून दिल्या आहेत. शेतकऱ्यांचा एकरी दोन लाख रुपये केलेला खर्च वाया गेला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. 

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील बोरी, काझड, अंथुर्णे, भरणेवाडी, लासुर्णे परिसरामध्ये सुमारे दोन हजार एकरामध्ये द्राक्षांच्या बागा आहेत. जुलै, सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये छाटणी केलेल्या द्राक्ष बागेवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला. डाऊनी रोगाने फुलोऱ्यामध्ये असलेले द्राक्षांचे घड जाळाले, मोठ्या झालेल्या द्राक्षांच्या घडाला डाऊणी प्रादुर्भाव झाल्याने घडातील मणी गळण्यास सुरुवात झाली आहे. 

परिपक्व झालेल्या द्राक्ष बागेतील द्राक्ष मणी नासले. भुरी रोगाने शेतकऱ्यांना दमवले आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी एक ते दीड लाख रुपयापर्यंत औषध फवारणीसाठी खर्च केला आहे. मजुरीसहित दोन लाख रुपये खर्च झाला आहे. पावसामुळे द्राक्षाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. 
 

माझ्याकडे दोन एकर द्राक्षाची बाग होती. 1 सप्टेंबर,15 सप्टेंबर व 8 ऑक्‍टोबर तीन टप्यांमध्ये द्राक्ष बागेची छाटणी केली होती. मात्र अवकाळी व परतीच्या पावसामुळे तीनही टप्प्यांतील द्राक्षांचे नुकसान झाले. एकरी दोन लाख रुपये खर्च झाला होता. एकरामध्ये चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने घात केला. 
- दीपक भोसले, शेतकरी, लासुर्णे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to grape gardens at Indapur