पुणे जिल्ह्यात आज धुवाधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

 पुण्यात गेल्या दहा दिवसांत पडलेल्या पावसाएवढा पाऊस पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर उद्या (ता. ८) एका दिवसात कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी हवामान खात्याने आजही ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.

पुणे - पुण्यात गेल्या दहा दिवसांत पडलेल्या पावसाएवढा पाऊस पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर उद्या (ता. ८) एका दिवसात कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी हवामान खात्याने आजही ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. गेल्या दहा दिवसांत पुणे शहरात सुमारे २०० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तेवढाच पाऊस आज मुख्यत्वे जिल्ह्यातील ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा या  घाटमाथ्यांवर कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

याबाबत ‘सकाळ’ला अधिक माहिती देताना हवामान खात्यातील शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी म्हणाले, ‘‘बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) ओडिशा, पश्‍चिम बंगाल मार्गे तो विदर्भाच्या दिशेने पुढे येत आहे. त्यामुळे पावसाचा जोर  वाढण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही भागांत आगामी दोन दिवसांत पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील. त्यामुळे या भागात ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे.’’

दहा दिवसांचा पाऊस एका दिवसात कसा?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील घाटमाथ्यावर २० सेंटिमीटरपेक्षा जास्त म्हणजे २०० मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुणे शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावरून उद्या एका दिवसात गेल्या दहा दिवसांमध्ये शहरात पडला तेवढा पाऊस घाटमाथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट होते.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

का वाढणार पाऊस? 
‘‘नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्हीही शाखा सक्रिय आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. त्याच वेळी पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढत आहे. त्याचा थेट परिणाम मध्य महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळे या भागात पाऊस वाढत आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याच्या परिणामामुळेही पुण्यात पाऊस पुन्हा वाढणार आहे. तसेच मॉन्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकला आहे. हवामान घटकाच्या विश्‍लेषणावरून बुधवारी (ता. ७) संध्याकाळपासून ते शुक्रवारी (ता. ९) दुपारपर्यंत पुणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे,’’ असे डॉ. कश्‍यपी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Pune district today