
Pune : उपनगरात पावसामुळे दाणादाण
औंध : संततधार पावसामुळे सूसगाव येथील महादेवनगर परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने पुन्हा एकदा गावाशी संपर्क तुटला आहे. या भागात बहुतांश कामगारांची लोकवस्ती असून रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे सर्व कामगारांना घरी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी व महाविद्यालयातील तरुण तरुणींनाही महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येत आहेत. रस्त्यावर आडवा दोर बांधून व तरुणांनी हाताची साखळी करून लहान मुलांसह सर्वांनाच रस्ता पार करण्यासाठी मदत केली. पाषाण परिसरातील लमाण तांडा वसाहतीत पाणी शिरल्याने बाजूला असलेला ओढा तुडुंब भरून वाहू लागला होता.
पाण्याचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कुणीही बाहेर पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सर्वांना करण्यात आल्याचे सहायक आयुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले. बोपोडीतील आदर्शनगरसह पूरप्रवण क्षेत्रातील रहिवाशांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सतर्क राहण्यासह पूर आल्यानंतर घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही महादेवनगर रस्त्याचे काम करावे, यासाठी पाठपुरावा करत आहोत परंतु निधी नसल्याचे कारण सांगत अजूनही काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे स्थानिक रहिवासी ऋषिकेश कानवटे यांनी सांगितले.
विठ्ठलनगरमध्ये सोसायटीपर्यंत पाणी
सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलनगर भागातील सोसायट्यांपर्यंत पावसाचे पाणी आले, तर वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर झालेल्या पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तसेच खड्ड्यांमुळे त्यात भर पडली. पानमळा पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, राजाराम पूल या भागात पाणी साचले होते. यासोबतच आनंदनगर परिसरातील विठ्ठलनगर भागात जलपूजन, शारदा सरोवर या सोसायट्यांपर्यंत पाणी आले. सुदैवाने पाण्याची पातळी फार जास्त वाढली नसल्याने केवळ रस्त्यापर्यंतच पाणी आले. मात्र दिवसभर पडलेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली होती.