पुण्यात पावसाचा जोर ओसरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain

पुणे शहर आणि परिसरात मागील आठवड्यापासून पावसाची संततधार कायम असली तरी पुढील दोन दिवसात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता.

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार

पुणे - शहर आणि परिसरात मागील आठवड्यापासून पावसाची संततधार कायम असली तरी पुढील दोन दिवसात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

तब्बल तीन ते चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसाचा गुरुवारी मात्र काहीसा जोर कमी झाला होता. शहरात १०.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाच्या मुसळधार सरींमुळे दरड कोसळण्याच्या तसेच रस्ते खचल्याचे पाहायला मिळाले.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात जून ते १४ जुलैपर्यंत शहरात सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. गेल्या महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती. त्यानंतर मात्र जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (ता. १५) पुणे व परिसरात मध्यम सरी तर घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मात्र, शनिवारपासून (ता. १६) शहर व परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यात सरासरीपेक्षा ४४ टक्के अधिक पाऊस

जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सरासरीपेक्षा ४४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीच्या तब्बल ८७ टक्के जास्त पाऊस नोंदला गेला. राज्यातील फक्त सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

पुण्यातील पावसाची नोंद (मिलिमीटर मध्ये)

पुणे - १०.४

लोहगाव - ११.६

चिंचवड - ३७

लवळे - १५

मगरपट्टा - ५

Web Title: Rain Will Less In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punerainDecrease