

राजा भिंगे खूनप्रकरणी एका संशयिताला अटक
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज; अन्य आरोपींचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १८ : शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजा भिंगे यांचा गोळ्या झाडून खून केल्याच्या प्रकरणात पंढरपूर शहर पोलिसांनी अवघ्या सात ते आठ तासांत एका संशयिताला अटक केली आहे. प्रवीण ऊर्फ तात्या देवीदास शिंदे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या राजा भिंगे यांचा मंगळवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास इसबावी येथील उमा नगर परिसरात राहत्या घराजवळ तीन गोळ्या झाडून खून करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैज्ञानिक विश्लेषण तपास पथकाला पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. भिंगे यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात चार जणांवर संशय व्यक्त केला आहे. त्यापैकी प्रवीण ऊर्फ तात्या शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
नगरसेवक नामदेव भुईटे खून प्रकरणाच्या दिशेने तपास
पंढरपूर येथील तत्कालीन नगरसेवक नामदेव भुईटे यांची २०१७ मध्ये मिरजजवळ रस्त्यात गाडी अडवून खून करण्यात आला होता. या प्रकरणात राजा भिंगे याच्यावर मिरज पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी भिंगे पाच ते सहा वर्षे तुरुंगात होते. न्यायालयाने सुमारे दीड वर्षापूर्वी त्याची निर्दोष मुक्तता केली होती. अटक केलेला संशयित प्रवीण ऊर्फ तात्या शिंदे हा नामदेव भुईटे यांचा जवळचा सहकारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी भुईटे खून प्रकरणाच्या अनुषंगानेही तपास सुरू केला आहे.
पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
राजा भिंगे (वय ५३) यांच्या खूनप्रकरणी पत्नी महानंदा भिंगे यांच्या फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २०१७ मध्ये आर्थिक व्यवहारातून नामदेव भुईटे आणि त्यांचे पती यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर भुईटे यांच्या खून प्रकरणात पती राजा भिंगे यांना अटक करण्यात आली होती. २०२४ मध्ये न्यायालयाने त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती. या पार्श्वभूमीवर दीपक वाडदेकर, प्रदीप पवार आणि शुभांगी नामदेव भुईटे यांनी अज्ञात व्यक्तींच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा संशय भिंगे यांच्या पत्नीने फिर्यादीत व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.