‘गुंजवणी’त आणखी तीन उपसा योजना

‘गुंजवणी’त आणखी तीन उपसा योजना
Published on: 

भोर, ता. २ : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या ३० सप्टेंबरच्या सुधारीत जलनियोजनात राजगड तालुक्यातील गुंजवणी धरण प्रकल्पाअंतर्गत वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोऱ्यातील तीन उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली आहे. यामुळे राजगड तालुक्यातील वांगणी व वाजेघर आणि भोर व हवेली तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यातील आणखी १ हजार ९३०.६१ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. यापूर्वी गुंजवणी धरण प्रकल्पामुळे ओलिताखाली असलेल्या २१ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रात १ हजार ९३१ हेक्टरने वाढ होऊन २३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
याबाबत भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात संग्राम थोपटे यांनी गुरुवारी (ता. १) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘४.१७ टीएमसी क्षमता असलेल्या गुंजवणी प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून, धरणात ३.६९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. यापूर्वी द्वितीय सुधारीत जलनियोजनात सिंचनासाठी ३.५४ टीएमसी, पिण्याच्या पाण्यासाठी ०.४३ टीएमसी व बाष्पीभवन ०.२० टीएमसी, असे एकूण ४.१७ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित होता. भोर व राजगड तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर होत नाही. त्यामुळे सिंचनासाठी आणखी ०.३५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे डिसेंबर २०२५ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनास कळविले. त्यानुसार जलसंपदा विभागाने त्यास मान्यता दिली. यानंतर हा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अखत्यारित असलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीनंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्यासाठी सादर केला जाईल. त्यानंतरच तृतीय जलनियोजनाच्या अंदाजपत्रकानुसार १८७.६६ कोटींपेक्षा जास्त निधी तीन सिंचन योजनांसाठी मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.’’
या वेळी गुंजवणी कृती समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर पांगारे व रोहन बाठे, अरविंद सोंडकर, दिगंबर चोरघे आदी उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेच्या वतीने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com