खेडमध्ये जिल्हा बॅंकेसाठी संचालकांची पळवापळवी

खेडमध्ये जिल्हा बॅंकेसाठी संचालकांची पळवापळवी
Published on

राजगुरुनगर, ता. १० : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी निवडण्याच्या प्रक्रियेत खेड तालुक्यात जबरदस्त राजकीय रस्सीखेच पाहावयास मिळत असून, राजकीय वातावरण खूपच तापले आहे. मतदार प्रतिनिधी निवडण्यासाठी सोसायटीचे संचालक फोडाफोडीला ऊत आला असून, काही ठिकाणी संचालक पळविल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत.
खेड तालुक्यातील आजी-माजी आमदारांच्या चढाओढीमुळे या प्रक्रियेचा राजकीय आखाडा झाला आहे. काही महिन्यांनंतर होऊ घातलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांचे मतदार प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तालुक्यात १०४ सोसायट्यांचे प्रतिनिधी निवडले जात आहेत. त्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. सध्या माजी आमदार दिलीप मोहिते पाटील बँकेचे संचालक आहेत. ते पुन्हा इच्छुक आहेत. सोसायट्यांवर त्यांची भक्कम पकड आहे. गेल्यावेळी ते बिनविरोध संचालक झाले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्याने सोसायट्यांवरचा त्यांचा प्रभाव कमी झाल्याची अटकळ बांधून त्यांच्याविरोधात आमदार बाबाजी काळे सर्वपक्षीय मोट बांधून उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. स्वतः काळे हेच उमेदवार असण्याचीही शक्यता आहे.
या निवडणुकीत मोहिते यांचा पाडाव केल्यास त्यांचे राजकीय महत्त्व खूपच कमी होईल, असा आडाखा बांधून त्यांचे सर्वपक्षीय विरोधक कामाला लागले आहेत. प्रत्येक सोसायटीमधून आपल्या बाजूचा प्रतिनिधी निवडून यावा, यासाठी राजकीय शक्ती पणाला लावली जात आहे. त्यातून जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. परिणामी काही ठिकाणी धक्कादायक निकाल दिसत आहेत.

एका- एका मताला महत्त्व
सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मतदार प्रतिनिधी निवडले जातात. आंबेठाण सोसायटीच्या मतदार प्रतिनिधी निवडीच्या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांना एका मताने पराभूत व्हावे लागले. तेथून आमदार काळे समर्थक गणेश मांडेकर मतदार प्रतिनिधी म्हणून निवडले गेले. तिन्हेवाडी सोसायटी ही मोहिते विरोधी सोसायटी समजली जात होती. मात्र, तेथून काळे समर्थक भास्कर जगदाळे यांचा पराभव करून मोहिते समर्थक विजय सांडभोर मतदार प्रतिनिधी म्हणून निवडले गेले. ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असून, बहुतेक सोसायट्यांमध्ये असे शह-काटशह देण्याचे राजकारण सुरू आहे.

संचालकांच्या अपहरणाच्या तक्रारी
मतदार प्रतिनिधी निवडीत कमालीची चुरस निर्माण झाल्याने सोसायटीच्या संचालकांचे महत्त्व वाढले आहे. कान्हेवाडी बुद्रुक सोसायटीचे संचालक रामदास महादू निमसे यांचे बाजीराव कोबल, ज्ञानेश्वर कोबल आणि कोंडिभाऊ सहाणे यांनी अपहरण केल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने खेड पोलिस ठाण्यात दिली आहे. तर, आंबोली सोसायटीच्या संचालक पुष्पा दत्तात्रेय शिंदे यांचे सुरेश शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि मंगल शिंदे यांनी अपहरण केल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने खेड पोलिस ठाण्यात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com