पुणेकरांना आता जंगलाचा राजा बघायला मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल झालेला सिंह बारा दिवसांनंतर नागरिकांना पाहता येणार आहे. यंदाच्या उन्हाळी सुटीत हे सर्वांचे प्रमुख आकर्षण असणार आहे. 

पुणे - सिंह बघण्यासाठी पुणेकरांना आता गुजरातमधील गीर अभयारण्ये किंवा इतर शहरांमधील प्राणी संग्रहालांत जावे लागणार नाही. कारण जंगलाच्या राजाचा रुबाब, त्याची भेदक नजर आणि ऐटितील चाल आता पुण्यातच बघायला मिळणार आहे. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल झालेला सिंह बारा दिवसांनंतर नागरिकांना पाहता येणार आहे. यंदाच्या उन्हाळी सुटीत हे सर्वांचे प्रमुख आकर्षण असणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात जंगलच्या राजाची उणीव प्रकर्षाने भासत होती. त्यामुळे हा सिंह या प्राणी संग्रहालयात आणला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या सिंहाचे स्थलांतर करण्याची तयारी सुरू होती. मध्य प्रदेशातील इंदौर येथून अकरा दिवसांपूर्वी कात्रज येथील प्राणी संग्रहालयात हा सिंह दाखल झाला. 

इंदौर येथून पुण्यात स्थलांतर केल्याने त्याला 21 दिवस सर्वांपासून दूर ठेवण्यात आले आहे. सध्या तो विलगीकरण कक्षात असून त्याचे निरीक्षण सातत्याने टिपण्यात येत आहे. पुढील बारा दिवस ही प्रक्रिया सुरू रहाणार आहे. त्यानंतर तो पुणेकरांना बघण्यासाठी कधी खुला करायचा? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. 

कात्रज येथील प्राणी संग्रहालयात यापूर्वीदेखील बाहेरच्या राज्यातून सिंह, वाघ असे वन्यप्राणी दाखल झाले आहेत. सध्या प्राणी संग्रहालयात एक सिंहीण आहे. आता सिंहदेखील आणल्यामुळे प्राणी संग्रहालयात येणाऱ्या नागरिकांना ही जोडी बघायला मिळणार आहे. 

विलगीकरण कक्षात  प्राण्यांना का ठेवतात? 
स्थलांतर केल्यानंतर प्राण्यांचा स्वभाव, त्यांचे हावभाव यात काही फरक पडतो का? हे निरीक्षण करणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आवश्‍यक आहे. त्यासाठी सिंहाचे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajiv gandhi zoo pune